Morning Drinks That Help Detox Your Body : मित्र भेटला की, खायला चल, मनासारखं जेवण नसेल, तर झोमॅटो, स्विगीवरून काहीतरी मागव. अशा प्रकारे बरेच लोक जंक फूडचे दररोज सेवन करतात. त्यामुळे बाहेरचं खाण्याची सवय आता सामान्य झाली आहे. पण, सतत बाहेरचे पदार्थ खाण्यामुळे शरीरात विषाक्त घटक जमा होऊ लागतात. शरीरात जमा होणाऱ्या विषाक्त घटकांमुळे लठ्ठपणा, थकवा, त्वचेवर मुरमे यांसह अनेक आजारांचा धोका निर्माण होत असतो. अशा परिस्थितीत शरीराचे डिटॉक्सिंग करणे खूप महत्त्वाचे ठरते. दररोज डिटॉक्स ड्रिंकचे सेवन केल्याने चयापचय सुधारते, ज्यामुळे शरीर आतून स्वच्छ होते.

जर तुम्हालाही तुमचे शरीर डिटॉक्स करायचे असेल, तर तुम्ही दररोज पुढील पेयांपैकी एखादे पेय घेऊ शकता. येथे आम्ही तुमच्यासाठी पाच प्रकारच्या डिटॉक्स ड्रिंक्सच्या रेसिपी घेऊन आलो आहोत, ज्यापैकी एखादे पेय तुम्ही दररोज पिऊ शकता…

लिंबू, काकडी आणि पुदिना

लिंबू, काकडी व पुदिना शरीराला सहजपणे डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतात. या डिटॉक्स ड्रिंकमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिंबामध्ये व्हिटॅमिन सी व अँटीऑक्सिडंट्स असतात; जे घटक रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. काकडी शरीराला हायड्रेट ठेवून, विषाक्त् घटक काढून टाकण्यास मदत करते आणि पुदिना पचन सुधारण्यास मदत करतो.

पण बनवायचं कसं?

हे पेय बनवण्यासाठी एक बाटली पाणी घ्या. त्यात लिंबाचे तुकडे, काकडीचे तुकडे व पुदिन्याची पाने घाला आणि काही वेळ तसेच ठेवून द्या. या पेयाने वजन कमी करण्याबरोबरच त्वचाही सुधारते.

लिंबू पाणी प्या

जर तुमच्याकडे कमी वेळ असेल, तर तुम्ही फक्त लिंबू पाणी पिऊ शकता. लिंबू पाणी हे एक उत्तम डिटॉक्स ड्रिंकदेखील आहे, ज्यामधील व्हिटॅमिन सी व अँटीऑक्सिडंट्स शरीरातील विषाक्त घटक बाहेर काढण्यास मदत करतात. तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी लिंबू सरबत पिऊ शकता. लिंबू सरबत बनवण्यासाठी अर्धा लिंबू एक कप कोमट पाण्यात पिळून ढवळून घ्या. तुम्ही त्यात थोड्या प्रमाणात मधदेखील घालू शकता. त्यामुळे पचन सुधारते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवते.

आले आणि मध

तुम्ही आले व मध घालूनही डिटॉक्स ड्रिंक बनवू शकता. त्यासाठी प्रथम आले किसून घ्या आणि ते पाण्यात उकळवा. काही वेळ उकळल्यानंतर ते द्रावण गाळून घ्या. त्यात मध मिसळा आणि त्याचे सेवन करा. खरं तर, आल्यामध्ये असे अनेक गुणधर्म आहेत, जे शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतात.