8 Tips To Make Soft Rotis At Home : पोळीशिवाय जेवण अपूर्ण मानले जाते. दुपारी जेवणापासून रात्रीच्या जेवणापर्यंत लोकांना भाजीबरोबर पोळी खायला आवडते. पण, प्रत्येकालाच मऊ लुसलुशीत पोळ्या बनवायला जमत नाहीत. त्यात जे नव्यानेच पोळ्या बनवायला शिकतायत त्यांची तर खूपच अडचण होते. कारण- बऱ्याचदा त्यांच्या पोळ्या कडक किंवा पापडासारख्या होतात. पोळी बनविण्यासाठी पीठ मळण्यापासून शेकण्यापर्यंत सर्व काही व्यवस्थित केले नाही, तर पोळी कधीच मऊ होणार नाही. त्यासाठी आम्ही मऊ लुसलुशीत पोळ्या बनविण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्या फॉलो करून तुम्ही मस्त टम्म फुगलेल्या पोळ्या बनवू शकता.
१) गव्हाचे चांगले पीठ वापरा
जर तुम्हाला मऊ लुसलुशीत पोळ्या बनवायच्या असतील, तर गव्हाचे चांगले पीठ वापरा. कारण- जेव्हा पोळ्या ताज्या चांगल्या दर्जाच्या गव्हाच्या पिठापासून बनवल्या जातात तेव्हा त्या खूप मऊ होतात. त्यात जर पीठ ताजे असेल, तर ते पाणी चांगल्या रीतीने शोषून घेते. त्यामुळे पीठ मऊसुत मळले जाते; पण पीठ खूप जुने व बरोबर दळलेले नसेल, तर मळताना ते कडक होते. तसेच त्याच्या चपात्याही कोरड्या होतात, ज्यामुळे त्याच्या पोत आणि चवीवर परिणाम होतो.
२) पीठ व्यवस्थित मळून घ्या
जेव्हा पीठ मळले जाते तेव्हा ते ग्लुटेन बनते. त्यामुळेच पीठ चांगल्या प्रकारे पसरते आणि गुळगुळीत होते. त्यासाठी पीठ नेहमी ८-१० मिनिटे चांगले मळा, जेणेकरून ते गुळगुळीत होईल. कारण- अशा प्रकारे मळलेल्या पिठाच्या पोळ्या मऊ होतात.
३) पीठ मळल्यानंतर करा ‘हे’ काम
पोळी मऊसुत बनविण्यासाठी पीठ मळल्यानंतर ते हलक्या ओल्या कापडात गुंडाळून, २०-३० मिनिटे बाजूला ठेवा. त्यामुळे ग्लुटेन योग्यरीत्या तयार होते. नंतर पीठ चांगले लाटून पोळ्या बनवा. असे केल्याने पोळ्या मऊ होतील.
४) कोमट पाण्याचा करा वापर
जर तुम्हाला मऊ पोळ्या बनवायच्या असतील, पीठ कोमट पाण्याने मळा. त्यामुळे पिठाचा गोळा मऊ राहतो आणि त्यापासून बनविलेल्या पोळ्याही दिवसभर चांगल्या मऊ राहतील.
५) पोळी नेहमी पातळ आणि एकसमान लाटा
पोळी लाटताना नेहमी ती जास्त जाड राहणार नाही याची काळजी घ्या. त्यासाठी कणीक जास्त घट्ट मळू नका. कारण- पातळ अन् एकसमान आकारात लाटलेल्या पोळ्या चांगल्या शेकल्या जातात. तसेच त्या चांगल्या प्रकारे फुगतात आणि दिवसभर मऊ राहतात.
६) गरम तव्यावर शेकवा
पोळी शेकण्यापूर्वी तवा चांगला गरम करा. त्यामुळे पोळी सर्व बाजूंनी समान रीतीने शेकली जाते. पोळी थंड तव्यावर शेकल्या, तर त्या कोरड्या आणि कडक होतात.
७) पोळी नीट परता
पोळी तव्यावर टाकताच त्यावर बुडबुडे दिसू लागतात. अशा वेळी पोळी लगेच परता. चमच्याने जास्त वेळ शेकू नका किंवा जास्त दाबू नका. असे केल्याने पोळी कडक होते. योग्य वेळी पोळी परतली, तर ती मऊ होते आणि चांगली शेकली जाते.
८) हवाबंद डब्यात ठेवा
पोळ्या बनविल्यानंतर त्या स्वच्छ कापडाने झाकून हवाबंद डब्यात ठेवा आणि डबा लगेच बंद करून ठेवा. त्यामुळे डब्यात वाफ राहते आणि पोळ्या मऊ व ओलसर राहतात. कारण- पोळ्या अशाच उघड्या ठेवल्यास लगेच कडक होतात.