Kairicha Gulamba Video : सध्या सोशल मीडियावर कैरीच्या अनेक रेसिपी व्हायरल होत आहे. तुम्ही कधी गुळंबा खाल्ला का? हा गुळंबा कसा बनवायचा, आणि त्याला बुरशी लागू नये म्हणून काय करावे, याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

Saritas Kitchen Food & Vlogs या युट्युब अकाउंटवरून सरिता यांनी गुळंबाची रेसिपी सांगत त्याविषयी खास टिप्स सांगितल्या आहेत. त्या व्हिडीओमध्ये सांगतात, “बाजारामध्ये छान कैऱ्या आलेल्या आहेत. आता मे महिना सुरू आहे, थोड्या दिवसाने कैऱ्या यायच्या बंद होतील. तरीही या कैऱ्याचा आस्वाद वर्षभर घेता यावा, त्यासाठी आपल्याकडे बऱ्याच पारंपारिक रेसिपी आहेत. त्यामध्ये कैरीचे लोणचे आहे, गुळंबा आहे, अजून बरंच काही आहे. त्यातले आपण आज गुळंबाविषयी जाणून घेणार आहोत.”

व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे –

वर्षभर टिकणारा कैरीचा गुळंबा

साहित्य

तोतापुरी कैरीचा किस २ कप
बारीक चिरलेला गूळ २ कप
काळं मीठ १/२ चमचा
लवंग २-३
दालचिनी १ इंच
वेलची पूड १/४ चमचा

पाहा व्हिडीओ

कृती

कैरी कोणत्याही प्रकारची घ्या. आणल्यानंतर तासभर पाण्यात भिजवून घ्या. त्यामुळे त्याच्यावरील चिक निघून जातो. कैरी भिजू घातल्यानंतर पुन्हा ती धुवून घ्यायची आणि एका स्वच्छ कोरड्या कॉटनच्या कपड्याने ती पुसून घ्यायची. त्यामुळे बाहेरच्या पाण्याचा स्पर्श होणार नाही आणि आपला गुळंबा लवकर खराब होणार नाही.

सुरूवातीला कैरीचे साल काढा आणि बारीक किसून घ्या.
कैरी किसून घेतल्यानंतर त्यानंतर त्यातील पाणी पिळून घ्या. कैरीमधला रस पिळून काढल्याने गुळंबा जास्त दिवस टिकतो.
त्यानंतर कढईत कैरीचा किस टाका आणि त्यात प्रमाणानुसार गूळ टाका (कैरी किती आंबट किंवा गोड आहे, त्यावरून गुळाचे प्रमाण ठरवा) आणि मिश्रण एकत्र करा. त्यानंतर झाकून १५ मिनिटे ठेवा. त्यानंतर गॅस सुरू करा आणि त्यावर कढई ठेवून हे मिश्रण दोन मिनिटे गरम करा. दोन मिनिटानंतर गूळ पूर्णपणे विरघळलेला दिसत आहे. त्यानंतर यात खडे मसाले, वेलची पूड आणि काळं मीठ. गॅस कमी ठेवायचा आणि हे मिश्रण नीट एकत्रित करायचं. हे मिश्रण दाटसर होईपर्यंत शिजवून घ्या.

खूप जास्त गुळंबा शिजवायचा नाही. गूळ घट्ट झालेला दिसेल. गुळंबा शिजला हे कसं ओळखायचं? तर थोडासा गुळंबा बोटावर घ्यायचा आणि अंगठा आणि तर्जनीमध्ये हा गुळांबा पकडायचा आणि सोडायचा आणि थोडी बारीक तार दिसेल. झाऱ्यावरीचा हा किस बघा आधी पांढरा दिसत होता आता सेमी पारदर्शक दिसतोय. याचा अर्थ आपला गुळंबा तयार झाला आहे. गॅस बंद करायचा आणि थंड होऊ द्यायचा.

गार झाल्यानंतर काचेच्या स्वच्छ व कोरड्या बरणीमध्ये भरायचा. याला पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नका, नाहीतर बुरशी लागायची शक्यता असते. वर्षभर हा गुळंबा टिकतो.