How To Make Pure Ghee At Home: गाईच्या दुधापासून बनलेल्या साजूक तुपाच्या सेवनाने अनेक मोठे आजार टळतात असे आयुर्वेदात सांगण्यात आले आहे. अगदी मिठाई ते भाज्या ते अगदी साध्या वरण भातावर सुद्धा तुपाची धार सोडली की वेगळीच कमाल चव येते. सत्यनारायणाच्या पूजेला बनणारा खास प्रसादही तुपाशिवाय अपूर्णच आहे. तुम्हाला माहित आहे का अनेक पोषणतज्ज्ञ तर वजन कमी करण्यासाठी सुद्धा तुपाचे सेवन करण्याचा सल्ला देतात. अशावेळी शुद्ध तूप वापरणे हे खूप आवश्यक आहे. बाहेरून आणलेल्या तुपात अगदीच नाही म्हंटल तरी अर्धा टक्के भेसळीची भीती असतेच. अशावेळी अनेक गृहिणींना घरीच तूप बनवण्याची इच्छा असते. अनेकदा हा प्लॅन फसतो आणि मग आठवडे- महिने साठवलेली दुधाची साय वाया जाते. तूप बनवताना कोणत्या चुका टाळायला हव्यात आणि नेमक्या कोणत्या स्टेप्स फॉलो कराव्यात हे आता आपण जाणून घेणार आहोत..
रेसिपीला सुरुवात करण्याआधी पूर्व तयारी कशी करायची हे जाणून घेऊयात. तूप बनवण्यासाठी दही किंवा दूधावरची मलई नियमित काढून हवाबंद डब्ब्यात साठवून ठेवा. तो डबा नेहमी फ्रीजमध्ये ठेवा. तुम्ही जितकी मलाई साठवाल त्याच्या निम्मे तूप मूळ रेसिपीत तयार होते त्यामुळे तुम्हाला आवश्यक तेवढे दिवस मलाई काढून बाजूला ठेवा.
तूप कसे बनवावे?
पुरेशी मलाई जमा झाली की ती एका टोपात काढून ती रवीने किंवा इलेक्ट्रिक बिटरने घुसळा. हळूहळू त्यावर लोणी साठायला सुरवात होईल. लोणी चमच्याने बाजूला काढा. जमा झालेले लोणी एका टोपात घेऊन गॅसवर मंद आचेवर ठेवा. गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत हळू हळू चमच्याने हलवून लोणी तापवून घ्या. लोणी पूर्णतः वितळल्यानंतर तूप गाळून घ्या.
हे ही वाचा<< दिवाळीत भेसळयुक्त तुपापासून राहा सुरक्षित; अस्सल गृहिणीच्या ‘या’ टिप्स वापरून ओळखा फरक
दरम्यान, घरगुती तूप हे दोन प्रकारे बनवता येते. मलई नसल्यास अनसॉल्टेड बटरपासून तूप बनवता येते. काहीजण म्हशीच्या दुधाचे पांढरे तूपही बनवतात. म्हशीचे दूध अधिक घट्ट असल्याने यातून अधिक मलाई मिळते. गायीचे सुद्धा अधिक दॅट्स असलेले दूध बाजारात उपलब्ध आहे.