आपला पगार भक्कम असूनही हातात आल्यावर कर भरावा लागत असल्याने तो कमी दिसतो. आपल्या मेहनतीची कमाई अशी हातातून निसटताना दिसल्यावर कोणाला बरे वाटेल? तुम्ही तुमचा पगाराला अधिक कर-कार्यक्षम करून अशा परिस्थितीला टाळून आपला पैसा वाचवू शकता. यामुळे कराच्या रुपाने जाणारा तुमचा पैसा वाचू शकेल. वित्तीय वर्षाच्या शेवटी अनेक जण कर वाचवण्याचे अनेक प्रयत्न करत असतात, पण ते कलम 80-सी पेक्षा अधिक विचार करत नाहीत. आपण पाहूया की कर कमी करण्यासाठी आणखी कोणते उपाय फायदेशीर ठरु शकतात.
* यूनिफॉर्म भत्ता: जर तुमच्या कामासाठी यूनिफॉर्म वापरणे आवश्यक असेल, तर कलम 10 (14) (i) प्रमाणे यूनिफॉर्मसाठी दिलेला भत्ता करमुक्त असतो. यात यूनिफॉर्मसाठी केलेला सर्व खर्च समाविष्ट आहे. पण तुम्हाला ही सूट घेण्यासाठी वित्तीय वर्षात केलेल्या सर्व खरेदीची बिले जोडणे बंधनकारक असते.
* शैक्षणिक कर्ज: शैक्षणिक कर्जावरील व्याजाची भरपाई संपूर्णपणे कर-मुक्त असून आयकर विभागाने त्याची मर्यादा निश्चित केलेली नाही.
* दान: नोंदणीकृत परोपकारी संस्था किंवा ट्रस्टला दिलेले दान कलम 80G खाली कर-मुक्त असते. त्यावर टॅक्सची सूट घेण्यासाठी स्टॅम्प लागलेली पावती असणे आवश्यक असते.
* मेडिकल भत्ता: वैद्यकीय खर्च दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. तुम्ही मेडिकल भत्त्यावर टॅक्सची सूट क्लेम करून काही अंशी हा भार कमी करू शकता. तुम्ही स्वतःसाठी, जोडीदार, मुले, आई-वडील आणि आश्रित भाऊ-बहिणींसाठी या वित्तीय वर्षात केलेल्या वैद्यकीय खर्चाची बिले सादर करून ही सूट घेऊ शकता.
* रिटायरमेंट लाभ / अंशदान: रिटायरमेंटसाठी केले जाणारे अंशदान केवळ तुमचे भविष्यच सुरक्षित करीत नाही, तर त्याचा उपयोग टॅक्स वाचवण्यासाठी केला जाऊ शकतो. असे अंशदान करण्यासाठी लोक फारसे उत्सुक नसतात, कारण अधिक अंशदान केल्याने कमी पगार हाती लागतो. आयकर विभागाने अशा अंशदानासाठी टॅक्समध्ये सूट देऊ करून लोकांना त्यांच्या भविष्यासाठी अधिक बचत करण्याचे प्रोत्साहन दिले आहे.
* पगाराची संरचना बदला: कामगारांना आपल्या पगारातील मूळ वेतन ही (बेसिक पे) सर्वात महत्वाची बाब वाटते. पण पगारातील हीच बाब संपूर्णपणे कर-पात्र असते. जर तुमच्या नोकरदाराकडून पगाराची संरचना बदलण्याची मुभा असेल तर तुम्ही अधिक कर-कार्यक्षम संरचना करून टॅक्सचा भार कमी करू शकता.
* घरभाडे भत्ता (HRA): HRA तुमच्या पगाराच्या संरचनेचा महत्वाचा घटक आहे. आयकर कायद्याप्रमाणे भाड्याच्या घरात राहाणाऱ्या कुठल्याही कामगाराला HRA मिळू शकतो.
* रजा प्रवास भत्ता (LTA): आयकर कायद्याच्या कल 10(5) प्रमाणे नियोक्त्याने कामगाराला दिलेला रजा प्रवास भत्ता कर-मुक्त आहे. हा भत्ता कामगाराच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या प्रवासाच्या गरजा भागवण्यासाठी पगाराचा भाग म्हणून दिला जातो. चार कॅलेंडर वर्षात दोन प्रवासांसाठी केलेला खर्च LTA मध्ये मोजला जातो. तुम्ही तुमच्या नियोक्त्याकडे प्रवास केल्याचा पुरावा दाखल करून ही सूट घेऊ शकता.
* कलम 80-सी: वरील मार्गांशिवाय कलम 80-सी मध्ये दर्शवलेल्या सूटसाठी गुंतवणूक करून आयकर विभागाच्या नियमांप्रमाणे कर वाचवता येतो. यापैकी काही आहेत आयुर्विमा प्रीमियम, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, बँक किंवा पोस्टात केलेली पाच वर्षांची मुदत ठेव, गृह कर्जाच्या परतफेडीतील मुदलाचा भाग, कमाल दोन मुलांच्या शिक्षणासाठी भरलेली फी, इत्यादी. टॅक्स मधील सूट घेण्यासाठी हे मार्ग पत्करायचे असल्यास तुम्हाला सर्व खर्चांची बिले आणि पावत्या सांभाळून ठेवणे गरजेचे आहे.
आदिल शेट्टी,
सीईओ, बॅंकबझार