पदार्थातील जास्तीचं तेल कसं काढाल? जाणून घ्या ‘या’ सोप्या टिप्स

तुमच्या जेवणात कोणत्याही पदार्थात जर तेल खूप जास्त झालं तर काय कराल? ह्या अगदी सोप्या टिप्स नक्की पहा

How to remove excess oil from food these simple tips gst 97
ग्रेव्ही, सूप, भजीतलं जास्तीचं तेल कसं काढाल? जाणून घ्या 'या' सोप्या टिप्स (Photo : Pixabay)

घरचं जेवण म्हणजे सुखच! जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊन कितीही प्रसिद्ध आणि चविष्ट पदार्थ खाल्ले तरी घरच्या जेवणाच्या चवीची सर कशालाच यायची नाही. पण आता स्वयंपाक म्हटलं म्हणजे कधीतरी एखादा पदार्थ फसणं, त्यातलं कशाचं तरी प्रमाण चुकणं, बिघडणं हे आलंच. कधी जास्तीचं तेल, मीठ तर कधी जास्त मसाला घातला म्हणून एखादा पदार्थ अपेक्षेपेक्षा जरा जास्तीच वेगळा होतो आणि मग तो खाण्यायोग्य करायचा कसा? पण त्यासाठी फार चिंता करण्याची काहीच गरज नाही. कारण, आपल्या आईने किंवा आजीने पारंपारिकरित्या चालत आलेले काही उपाय किंवा टिप्स आपल्याला कधी ना कधी सांगितलेल्या आणि शिकवलेल्याच असतात. उदाहरणार्थ, एखादा पदार्थ जर खूप खारट झाला तर त्यात कणकेचे काही गोळे घालून, काही वेळ तसेच ठेवून काढून टाकले कि त्या पदार्थाचा खारटपणा निघून जातो. आज आम्ही देखील तुम्हाला अशाच काही ट्रिक्स सांगणार आहोत. या टिप्स आहेत जास्त झालेल्या तेलाबद्दल. तुमच्या जेवणात कोणत्याही पदार्थात जर एखादं वेळी तेल खूप जास्त झालं तर काय करावं? याबाबत आता अगदी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

ग्रेव्ही/करी

@24hrknowledge हँडलवर करण्यात आलेल्या ट्विटनुसार, कोणत्याही ग्रेव्हीतून किंवा करीतून जास्त झालेलं तेल काढून टाकण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे मोठं बर्फाचे तुकडे ठेवणे. व्हिडिओनुसार, जादा तेल बर्फाच्या खालच्या बाजूला चिकटतं आणि एक थर तयार होतो जो अगदी सहज काढला जाऊ शकतो आणि ग्रेव्हीपासून वेगळे केला जाऊ शकतो. ग्रेव्हीमधून जास्तीचं तेल काढून टाकण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे करी थंड होऊ देणे. ती काही तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवा. त्यातील जास्तीचं तेल वरच्या बाजूस घट्ट झालेलं दिसेल. ते तेल तुम्ही चमच्याने काढून टाकू शकता.

डीप-शॅलो फ्राईड पदार्थ

कोणताही पदार्थ हा नेहमी योग्य स्मोकिंग पॉईंटपर्यंतच तळा. जेणेकरून पदार्थात जास्त तेल शोषलं जाणार नाही. पॅन किंवा कढईत कोणताही पदार्थ तळताना छिद्र असलेलाच चमचा वापरा. उदा. झारा जो आपण सामान्यतः वापरतो. त्याचसोबत, पदार्थातील अतिरिक्त तेल काढून ठेवण्यासाठी तो पदार्थ किचन टॉवेल किंवा विशिष्ट प्रकारच्या कागदावर ठेवा. जेणेकरून, त्यातलं सगळं तेल शोषलं जाईल.

होममेड सॉस

घरी बनवलेल्या सॉसमधून जास्तीचं तेल काढून टाकण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे एका तासासाठी तो सॉस रेफ्रिजरेट करा. त्यानंतर, त्याचा वर जमा झालेला तेलाचा थर चमच्याने काढून टाका. सॉस उकळवा, तो थंड होऊ द्या. आता त्यातील जास्तीचं तेल वर येईल. तुम्ही तुम्ही हे तेल अगदी सहज काढून टाकू शकता. जेणेकरून तुमचा सॉस खाण्यायोग्य होईल.

सूप

असं बऱ्याचदा घडतं की बटर आणि तेलाच्या मिश्रणामुळे सूपमध्ये खूप जास्त प्रमाणात फॅट्स असतात. तज्ञांच्या मते, आपण त्यासाठी तेल शोषून घेणारा कागद किंवा सर्व्हिटचा वापरू शकता. कागद/ सर्व्हिट थोडंसं दुमडा आणि त्यानंतर तेल तरंगणाऱ्या कोमट सूपवर हलकंसं टॅप करा. सर्व्हिट किंवा कागद जास्तीचं तेल शोषून घेईल आणि तुमचं सूप खाण्यासाठी तयार असेल.

सुकी भाजी

तुमच्या सुक्या भाजीत जर तेल खूप जास्त झालं तर त्यात भाजीच्या अंदाजाने भाजलेलं बेसनाचं घाला. होमशेफच्या मते, भाजीच्या प्रमाणावर अवलंबून थोडंसं भाजलेलं बेसन घाला आणि ४ ते ७ मिनिटं भाजी शिजवा. हे बेसनाचं पिठी भाजीतील तेल शोषून घेईलच पण त्याचसोबत तुमच्या भाजीची चव देखील वाढवेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: How to remove excess oil from food these simple tips gst