How To Remove Green Algae From Concrete Naturally : पावसाळ्यात अनेक समस्या भेडसावू लागतात. यात सर्वात मोठी समस्या म्हणजे घराच्या बाहेरील भिंती, छत आणि पायऱ्यांवर जाड शेवाळं वाढू लागते, ज्यामुळे घराच्या भिंतींचा रंग निघून खराब दिसू लागतात. यात घराच्या पायऱ्यांवर वाढलेल्या गुळगुळीत शेवाळावर पाय पडल्यास घसरून पडण्याची भीती असते, याने दुखापतीचा धोका असतो. पावसात वाढणाऱ्या या शेवाळामुळे बाहेरून घराची शोभाही नाहीशी होते. अशावेळी ही शेवाळं कितीही घासून काढली तरी ती पुन्हा काही दिवसांनी वाढते.
सततच्या पावसातील ओलाव्यामुळे बाहेरील भिंती, पायऱ्यांवर हिरव्या किंवा काळ्या रंगाची शेवाळं वाढू लागते. अशावेळी काही घरगुती ट्रिक्स फॉलो करून तुम्ही ही शेवाळं सहज काढून टाकू शकता.
कडक ब्रश आणि स्क्रॅपर्स
तुम्ही कडक ब्रश आणि स्क्रॅपर्सच्या मदतीनेही शेवाळं काढू शकता. याने निघत नसल्यास तुम्ही मीठ आणि पाण्याचा वापर करून शेवाळं घासून काढू शकता. यासाठी शेवाळावर थोडे मीठ आणि पाणी टाकून ती कडक ब्रशने घासून काढा. एकदा काढल्यानंतर तिथे पुन्हा शेवाळं वाढू नये यासाठी त्या ठिकाणी पाणी साचू देऊ नका.
लिंबाचा रस आणि मीठ
घराबाहेर वाढलेली शेवाळं काढण्यासाठी तुम्ही लिंबाचा रस आणि मिठाचा वापर करू शकता. लिंबामध्ये नैसर्गिक आम्ल असते, जे शेवाळं सहजपणे काढू शकते. तर तुम्ही शेवाळावर लिंबाचा रस आणि मीठ टाकून थोडं स्क्रब करा, यानंतर १५ मिनिटं तसचं राहू द्या. नंतर पुन्हा स्क्रब किंवा ब्रशने घासून घ्या. यानंतर शेवाळं जमा झालेली जागा स्वच्छ पाण्याने धुवा.
व्हाईट व्हिनेगर
घराच्या पायऱ्या किंवा भिंतीवर जमा झालेली शेवाळं काढण्यासाठी तुम्ही व्हाईट व्हिनेगरचा वापर करू शकता. व्हिनेगरमध्ये अॅसिटिक अॅसिड असल्याने शेवाळं सहज निघून जाते. यासाठी व्हिनेगरमध्ये समप्रमाणात पाणी घ्या आणि ते मिश्रण शेवाळं असणाऱ्या जागी स्प्रे करा. यानंतर ब्रशच्या मदतीने ती जागा स्क्रब करा आणि पाण्याने स्वच्छ करा, अशाने शेवाळाने भरलेली घराची गॅलरी, भिंत, टाइल्स स्वच्छ होईल.
बेकिंग सोडा आणि पाणी
बेकिंग सोडा आणि पाण्याच्या मिश्रणानेही तुम्ही शेवाळं काढू शकता. यासाठी पाण्यात बेकिंग सोडा मिक्स करून त्याची जाडी पेस्ट बनवा, यानंतर शेवाळं जमा झालेल्या ठिकाणी लावून ती ३० मिनिटे तशीच राहू द्या, नंतर ब्रश किंवा स्क्रबरच्या मदतीने घासून घ्या आणि पाण्याने स्वच्छ धुवा.