गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. या काळात त्वचा फुटायला लागते. तसेच त्वचा कोरडी झाल्याने अंगाला खाजही सुटायला लागते. मात्र, त्यामुळे आपली त्वचा खराब होण्याची शक्यता असते. परंतु, घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास या समस्येचे निराकरण होऊ शकते. पाहुयात त्वचेचा कोरडेपणा दूर होण्यासाठी काळजी घ्यायला हवी याविषयी….
थंडीत त्वचा कोरडी पडली की मॉश्चराइजर लावण्याचा पर्याय अनेकजण स्विकारतात. मात्र, त्यामुळे त्वचा आणखी कोरडी होते. याशिवाय आपण आंघोळीच्या वेळी अंगाला लावत असलेला साबण त्वचेच्या कोरडेपणासाठी कारणीभूत असतो. त्यामुळे थंडीत अंगाला साबण लावणे टाळावे. याऐवजी उटणे किंवा हळद, दूध आणि डाळीचे पीठ लावावे.
-थंडीत रात्री झोपताना अंगाला नारळाचे तेल लावून झोपा. हे तेल त्वचेत मुरते आणि त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. यामुळे सकाळी उठल्यावर त्वचा तितकी कोरडी न होता त्याला काही प्रमाणात मऊपणा येतो.
– व्हिनेगर हे त्वचेच्या कोरडेपणासाठी अतिशय उपयुक्त असते. कोरडेपणा निघून जाण्यासाठी हाताला व्हिनेगर लावून हात गरम पाण्याने धुवा आणि यामुळे तुमचे हात मुलायम होण्यास मदत होईल.
– शरीराच्या अनेक समस्यांसाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक असते. शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य ठेवल्यास त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.
– हातांवर केमिकल असलेली उत्पादने वापरण्यापेक्षा नैसर्गिक उत्पादनांचा वापर केला पाहिजे. बटर, लोणी, तेल, कोरफड आणि ऑलिव्ह ऑईल ही उत्पादने उपयुक्त ठरतात.
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)