How to use aavala for hair growth: सध्या देशभरातील हवामानात वेगाने बदल होताना दिसत आहेत. थंडी-उन्हाळा आणि पावसाळी वातावरण असलेल्या या दिवसांत आरोग्याबरोबरच केसांवरही परिणाम होत असल्याचे जाणवते. विशेषतः केसगळतीची ही समस्या अनेकांना असते. सुरुवातीला थोडे केस गळणे ही सामान्य बाब असली तरी योग्य काळजी न घेतल्यास हीच समस्या पुढे गंभीर होऊ शकते.
महागडे शॅम्पू, ऑइल्स किंवा इतर उत्पादने वापरूनही अनेकदा अपेक्षित परिणाम दिसत नाही; पण काही सोपे आणि घरगुती उपाय केसांच्या आरोग्यासाठी फार प्रभावी ठरू शकतात. त्यापैकीच एक उत्तम उपाय म्हणजे आवळ्याचा रस.
केसांची काळजी कशी करावी?
केसगळतीवर उपाय म्हणून लोक वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करतात. मात्र, बदलत्या हवामानात घरगुती पद्धतीने केलेली काळजी जास्त फायदेशीर ठरते. आवळा हा त्यातील सर्वोत्तम पर्याय आहे. केसांना मुळापासून बळकट करणे, त्यांचा घनदाटपणा टिकवणे आणि चमक वाढवणे यासाठी आवळा उपयुक्त ठरतो.
आवळ्याचा रस केसांसाठी फायदेशीर का आहे ?
आवळ्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, जे केसांना मुळांपासून मजबूत करते. नियमित वापर केल्याने केसगळती कमी होते. त्यामध्ये असलेले प्रतिजैविकता (Anti-bacterial) आणि प्रतिबुरशी (Anti-fungal) हे गुण डोक्यावरील कोंडा कमी करण्यात मदत करतात. त्यामुळे टाळू स्वच्छ राहते आणि केसांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार होते.
आवळ्याचा रस लावण्याचे फायदे
१. केसांची मुळे मजबूत होतात.
२. केस दाट, मऊ व चमकदार होतात.
३. केसांमधील कोंडा कमी होतो.
४.केसगळती कमी होऊन नवीन केसवाढीस प्रोत्साहन मिळते.
५. टाळूतील अशुद्धता दूर होते.
केसांवर आवळ्याचा रस कसा लावावा?
१. सर्वप्रथम ताजे आवळे घेऊन, त्याचा रस काढावा.
२. हा रस बोटांच्या टोकांना लावून हलक्या हाताने टाळूवर मसाज करावा.
३. नंतर केस सुमारे अर्धा तास तसेच ठेवावेत.
४. त्यानंतर शॅम्पूने केस धुवावेत.
त्याचप्रमाणे दररोजच्या व्यस्त जीवनशैलीत थोडा वेळ काढून घरच्या घरी सोपे उपाय अवलंबले, तर केस मजबूत, घनदाट आणि सुंदर राहतील. आता केसगळतीबद्दल चिंता करण्यापेक्षा, हे सोपे उपाय करून स्वतः अनुभव घ्या आणि बदल जाणवा.