परिक्षांचा काळ हा फक्त मुलांसाठीच नव्हे तर त्यांच्या पालकांसाठीही फार तणावाचा असतो. परीक्षांमुळे येणारी अस्वस्थता आणि ताणापासून मुलांना दूर ठेवायचे असेल तर मुलांना चांगली आणि पुरेशी झोप मिळेल, याची पालकांनी सर्वप्रथम काळजी घ्यायला हवी. परीक्षांच्या काळात पुरेशी झोप मिळणे अत्यावश्यक असते कारण त्यामुळे एकाग्रता, उत्साह आणि स्मरणशक्ती वाढते. परीक्षेच्या आधी आणि ऐन परीक्षेत मुलांना वेळेचे नियोजन, आकलनशक्ती आणि आत्मविश्वास वाढवता यावा यासाठी पालकांनी खाली दिलेले काही सल्ले अंमलात आणावेत. स्लीप@10 या उपक्रमाअंतर्गत यासाठी काही खास टीप्स देण्यात आल्या आहेत. त्यांचा योग्य पद्धतीने विचार केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लवकर झोपे तो लवकर उठे

बऱ्याच मुलांना रात्री उशिरापर्यंत जागून अभ्यास करण्याची सवय असते, पण त्यामुळे आधीच तणावाखाली असलेल्या आणि थकलेल्या मेंदूवर अधिक भार पडतो. ही सवय स्मरणशक्तीसाठी हानिकारक आहे. रात्री उशिरापर्यंत जागण्याऐवजी वेळेवर झोपून सकाळी लवकर उठणे लाभदायक असते. झोपेच्या व्यवस्थित नियमनामुळे मेंदूची ग्रहणशक्ती आणि स्मरणशक्ती वाढते. थोडक्यात, अभ्यास-झोप-उजळणी हा क्रम स्मरणशक्तीसाठी सगळ्यात फायदेशीर आहे.

इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर कमी करा

टेलिव्हिजन, व्हिडीओ गेम्स, मोबाईल फोन आणि या प्रकारच्या विरंगुळ्याच्या उपकरणांचा वापर आपल्या शरीराला आणि मेंदूला पुरेशी विश्रांती मिळू देत नाही. झोपण्यापूर्वी कमीत कमी एक तास तुमच्या मुलांना या उपकरणांपासून दूर ठेवा. खरे तर परीक्षांच्या काळात ही उपकरणे तुमच्या मुलांच्या बेडरूममधून हद्दपार करणे हा त्यांच्या झोपेचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे.

विरंगुळ्याचे काही मार्ग शोधा

परीक्षांच्या काळात मुलांमधील ऊर्जेचा पुरेसा वापर होत नाही, कारण त्या काळात बाहेर फिरण्यावर आणि मैदानी खेळांवर मर्यादा आलेल्या असतात. पण यामुळे त्यांच्या झोपेवर अनिष्ट परिणाम होतो. त्यामुळे शरीरातल्या अतिरिक्त उर्जेचा वापर होण्यासाठी पालकांनी मुलांना कुठल्यातरी शारीरिक कामात किमान तासभर तरी गुंतवले पाहिजे. थोडे पायी चालणे किंवा इजा होणार नाही अशा प्रकारचे काही मैदानी खेळ खेळायला लावणे आवश्यक आहे. यामुळे अभ्यासाला बसताना मुले उत्साही असतील आणि एकाग्र होतील. शिवाय सतत अभ्यास कंटाळवाणा न होता त्यांना रात्री शांत झोपही लागेल.

मुलांच्या आहाराची विशेष काळजी घ्या

मेंदूची ग्रहणशक्ती आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सकस आहार अत्यंत आवश्यक आहे. प्रथिनांनी युक्त अशा अन्नाचा (उदा. अंडी, बदाम, अक्रोड, फळे) आणि दोन जेवणांच्या मधल्या हलक्या नाश्त्याचा समावेश मुलांच्या आहारात आवर्जून करा. बिस्किटे, केक्स आणि गोड शीतपेये त्यांच्यापासून दूर त्यांना ठेवा कारण त्यातून अतिरिक्त ऊर्जा मिळते आणि ती पचण्यास जड असतात. अशा पदार्थांमुळे मुलांच्या झोपेचे गणित बिघडते. खाण्याच्या नियमित वेळा आणि हलका आहार तुमच्या मुलांना परीक्षांच्या काळात निरोगी आणि उत्साही ठेवेल.

अभ्यासाला बसण्याची पद्धत तपासा

शरीर आणि मेंदू दुसऱ्या दिवशी उत्साही आणि एकाग्र राहण्यासाठी आदल्या रात्री पुरेशी झोप जितकी अत्यावश्यक असते, तितकीच आपल्या बसण्याची पद्धत महत्वाची असते. अभ्यास करताना बसण्याची योग्य पद्धत आपल्या मेंदूची ग्रहणशक्ती आणि स्मरणशक्ती वाढवते. बसण्याची योग्य पद्धत आपल्या शरीराचा तणाव कमी करते आणि आकलनशक्ती वाढवते. पाठीचा ताठ कणा आणि सरळ, न झुकलेले खांदे आपली स्मरणशक्ती वाढवतात, कारण योग्य पवित्र्यात बसल्यावर आपला रक्तप्रवाह आणि मेंदूला मिळणारा प्राणवायू यांचे योग्य नियोजन होते. थोड्या थोड्या वेळाने उठून काही पावले चालणे किंवा दोरीवरच्या उड्या मारणे हाही यासाठी एक उत्तम उपाय असल्याचे काही जणांचे मत आहे. बिछान्यात झोपून वाचणे, खांदे झुकवून बसणे किंवा मान कायम खाली घालून वाचणे या सवयी सोडून द्या कारण त्यांच्यामुळे आपण आळशी, निरुत्साही आणि उदास होऊन जातो. म्हणजेच, परीक्षांच्या काळात मुलांचे आरोग्य आणि कामगिरी उंचावण्यासाठी फक्त झोपेच्या नियोजनाकडेच नाही तर मुलांच्या आहाराकडे, सवयींकडे आणि बसण्याउठण्याच्या पद्धतींकडेही पालकांनी काटेकोर लक्ष देणे महत्वाचे आहे.
डॉ. प्रीती देवनानी, स्लीप थेरपिस्ट

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Importance of sleep during exams and other schedule planning is needed
First published on: 11-03-2018 at 14:49 IST