लठ्ठपणाप्रमाणेच वजन कमी असणे किंवा खूप बारीक असणे ही एक वाढती समस्या आहे. अशा बारीक मुला-मुलींना तुम्हाला घरातले खायलाच घालत नाही का? किंवा मुलांना तर काय मुलीसारखा बारीक आहेस अशापद्धतीने हिणवले जाते. इतकेच नाही तर अशा जास्त बारीक असणाऱ्या मुलामुलींना लग्न ठरवितानाही बारीक असल्याने नकार मिळण्याची शक्यता असते. यातही काही जण कमी खातात म्हणून तर काही जण नीट खाता पिताही त्यांच्या अंगी लागत नाही म्हणून बारीक असतात. लठ्ठपणामुळे ज्याप्रमाणे आरोग्याच्या विविध तक्रारी उद्भवतात त्याचप्रमाणे खूप बारीक असणाऱ्यांनाही काही समस्या उद्भवतात. पण कमी असलेले वजन वाढविण्यासाठी नेमके काय करावे हे अनेकांना माहित नसते. यामध्ये व्यायामाबरोबरच आहारातील अनेक बदल उपयोगी ठरतात. पाहूयात काय केल्यास फायदा होईल…
पोषण महत्त्वाचे
तुम्ही बारीक असलात तरी तुमच्या शरीराचे पोषण होणे आवश्यक असते. तसेच तुमचे शरीर थोडे तरी भरलेले दिसणेही तुमच्या व्यक्तिमत्त्वासाठी आवश्यक असते. स्नायूंची ताकद वाढण्यासाठी तसेच वजन वाढण्यासाठी आहारात पोषक पदार्थांचा समावेश करावा. यासाठी आहारात प्रोटीन, फायबर आणि व्हीटॅमिन्सचा समावेश असणे गरजेचे असते.
कॅलरीज असणारे पदार्थ खा
कॅलरीमुळे वजन वाढण्यास मदत होते. त्यामुळे आहारात जास्तीत जास्त कॅलरी असणाऱ्या पदार्थांचा समावेश ठेवा. कॅलरीजमुळे स्नायूंची ताकद वाढण्यासही मदत होते. त्यामुळे या लोकांनी कॅलरी असलेले पदार्थ खाण्यास हरकत नाही.
प्रोटीन
प्रोटीन हे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. यामुळे वजन वाढण्यासही मदत होते. व्यायामानंतर प्रोटीन घेतल्यास त्याचा फायदा होतो. यामुळे शरीराची आणि स्नायूंची ताकद वाढण्यासही मदत होते.
व्यायाम
व्यायाम हा सगळ्यांसाठीच महत्त्वाचा असतो. लठ्ठ लोकांना चरबी कमी करण्यासाठी व्यायाम करावा लागतो. पण बारीक लोकांनीही योग्य तसा व्यायाम केल्यास त्यांची तब्येत सुधारण्यास निश्चितच मदत होते. कारण व्यायामानंतर विशिष्ट पदार्थ खाल्ल्यास त्याचा वजन वाढण्यास उपयोग होतो.