आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची माहिती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संयुक्त राष्ट्राने २०००मध्ये हाती घेतलेल्या मिलेनियम डेव्हलपमेंन्ट गोल्स (एमडीजीएस)अंतर्गत आरोग्य क्षेत्रातील तीन ध्येय गाठण्यात भारताने वाटचाल सुरू केली असून लवकरच हे ध्येय निश्चितपणे गाठणार आहे, असे मत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याणमंत्री जे.पी.नड्डा यांनी व्यक्त केले.

२०१५ पर्यंत आठव्या एमडीजीएसअंतर्गत आरोग्य क्षेत्रातील बालमृत्यू, मातेचे आरोग्य आणि एचआयव्ही, मलेरिया व अन्य आजार या तीन बाबींवर नियंत्रण मिळविण्याचे उद्दिष्ट आखण्यात आले होते. सद्य:स्थितीला भारतात पाच वर्षांखालील मुलांच्या मृत्यूचा दर आणि मातेच्या मृत्यूचा दर कमी झाला आहे. मात्र तो जागतिक सरासरीपेक्षा आणखी कमी असायला हवा, असे नड्डा म्हणाले. २००० या वर्षांच्या तुलनेत एचआयव्ही, क्षयरोग आणि मलेरिया या विकारांमुळे येणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही घटले आहे. पोलिओचे प्रमाणही घटले असून लवकरच संपूर्ण पोलिओचे उच्चाटन करण्यात येईल, असा विश्वास नड्डा यांनी दिला.

आसाम वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात आरोग्यमंत्री बोलत होते. माता आणि जन्मलेल्या मुलांमधील नेओनाताल टिटॅनस(धर्नुवात)वरदेखील मात केल्यामुळे हे यश आशादायी असून राष्ट्रीय आरोग्य मोहिमेअंतर्गत हाती घेतलेल्या विविध संशोधनांतून मिळालेल्या सकारात्मक परिणामांची खात्री देणारे आहे. त्याचबरोबर पुढील तीन ते चार वर्षांत असंसर्ग विकारांबाबत सरकारतर्फे व्यापक स्वरूपात काम हाती घेतले आहे. गेल्या दीड वर्षांत त्याला बऱ्यापैकी यश मिळाले असून इंद्रधनुष, कायाकल्प, अमृत यांसारख्या नवीन योजनांसोबतच नवीन औषधांची निर्मिती, एडस्-एचआयव्हीनियंत्रण कार्यक्रम सरकारने हाती घेतल्याचे नड्डा म्हणाले.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India on track to achieve health related mdgs j p nadda
First published on: 17-02-2016 at 03:17 IST