निनाद परुळेकर

पक्षीनिरीक्षणाची आवड असली तरी, पक्ष्यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणे, त्यांचे जन्म, प्रजात अभ्यासणे मला जमत नव्हते. एक रानवेडा छायाचित्रकार या नात्याने त्या पक्ष्याला निरीक्षण करता करता कॅमेऱ्यात टिपायचे आणि त्यासंदर्भात जे काय अनुभव आले, त्याची नोंद करायची, एवढय़ा शिदोरीवर माझा पक्षीदर्शन प्रवास आजपर्यंत झाला होता. पण एक इच्छा मनात कायम होती. ती म्हणजे ‘ऑस्प्रे’ या शिकारी पक्ष्याला कॅमेऱ्यात चित्रबद्ध करणे. ‘ऑस्प्रे’ दर्शनाची हुरहुर मात्र मनात कायम होती.

मध्यंतरी माझा एक पक्षीवेडा मित्र असाच कुठेतरी भटकून बरंच फोटो घेऊन आला होता. त्यात त्याने ‘‘हा भिगवणला मिळालेला ऑस्प्रे’’ असा उल्लेख, एक फोटो दाखविताना काढला होता. झालं, माझं ‘खूळ’ बळावलं! आता या ‘मासेमार’ पक्ष्याला ‘बाय ऑल मीन्स’ टिपायचंच, असा निर्धार केला अन् कामाला लागलो.

‘मिशन मासेमार.’

प्रवासाच्या आवश्यक सामानाव्यतिरिक्त दोन कॅमेरा बॉडी, ७०-३०० मिलीमीटरचे एक लेन्स आणि महत्त्वाचे म्हणजे कॅमेऱ्याच्या दुसऱ्या बॉडीसाठी १५०-६०० मिलीमीटरचे एक मोठे, सुपर टेलिफोटो लेन्स (फक्त लांबवर असणाऱ्या पक्ष्यांना कॅमेऱ्याच्या रेंजमध्ये आणण्यासाठी म्हणून बनविलेले.) मुंबईच्या एका कॅमेरा डिलरकडून दैनंदिन भाडेतत्त्वावर घेतले.

बोरीवलीहून सकाळी आठ वाजता सुटलेली एसटीची ‘करमाळा’ बस संध्याकाळी पाचच्या सुमारास भिगवणला पोहोचली. तेथे उतरून रिक्षाने ‘कुंभारगाव’ या नेमक्या ठिकाणी पोहोचलो, जेथे पक्ष्यांची जत्रा भरली होती आणि ज्या स्थानिक गाईडकडे मी मुक्काम करणार होतो त्या उमेश सल्लेकडे उतरलो. त्याला माझ्या येण्याचा हेतू सांगितला. उमेश सल्ले हा उत्तम स्थानिक गाइड तर आहेच, पण उत्तम छायाचित्रकारही बनला आहे. बहुतेक सर्व पक्ष्यांची मराठी तसेच शास्त्रीय नावे त्याला माहीत झालेली आहेत. त्याव्यतिरिक्त पक्ष्यांच्या सवयी, त्यांचे खाद्य, त्यांचा दिनक्रम या साऱ्या गोष्टींची माहिती त्याने अभ्यासाने मिळविलेली आहे. मात्र, ‘ऑस्प्रे’ हा दिसण्यास सहज नाही, हे त्याला माहीत होते. तरीही त्याने मला आश्वस्त केले.

दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता आम्ही भीमा नदीच्या किनाऱ्यावर बांधून ठेवलेल्या होडीत जाऊन बसलो. उमेशने होडी पुढे सरकवून खोल पाण्यात लोटली. इंजिन असल्यामुळे आम्ही वेगाने पाच-सहा किमी पुढे गेलो. इथे नदीचे पात्र फारच रुंद होते. वातावरण सामसूम होते.

उमेशचा हिशोब असा की, सकाळची वेळ असल्याने सर्वच पक्ष्यांना भूक लागलेली असते. त्यामुळे ते पक्षी मासे, बेडूक, पाणवनस्पती व अन्य जलजीव खाण्यासाठी बाहेर पडतात आणि पाण्यात सूर मारतात, पाण्यावर येतात. त्यामुळे फोटो मिळण्याची शक्यता चांगली आहे.

अशा वेळा काही शिकारी पक्षी या पक्ष्यांना पकडण्यासाठी टपलेले असतात. तेव्हा त्याही शिकारी पक्ष्यांचे दर्शन होईल, असा अंदाजही त्याने जोडला.

ऑस्प्रे मात्र मासेच पकडतो अन् सकाळी त्यालाही न्याहारी करायची असल्याने तो दिसण्याची शक्यता असतेच!

अन् काय आश्चर्य!

उमेश माझ्या कानाकडे येऊन मोठय़ाने कुजबूजला. ‘तो बघा, राइटला, तारेच्या पोलवर.’

उमेशच्या तीक्ष्ण अन् अनुभवी नजरेला पक्षी पटकन दिसला. मला तो पोल दिसला. त्या विजेच्या ताराही दिसल्या, पण पोलच्या जंक्शनवर जो पक्षी बसला होता तो मला कावळाच वाटला म्हणून मी तिकडे दुर्लक्ष  केले.

त्याने होडीचे इंजिन बंद केले. त्यामुळे आसमंत एकदम शांत झाला. होडी तशी वेगात होतीच, पण तिचाही वेग हळूहळू कमी झाला. स्वत:ला कपडय़ांनी पूर्ण ‘कॅमोफ्लेज’ केलेल्या उमेशने अलगदपणे होडीतले लाकडे वल्हे उचलले आणि तो विशिष्ट दिशेने, त्या पक्षी बसलेल्या पोलकडे सरकत सरकत, वल्हे मारत पुढे जाऊ लागला.

‘काका, कॅमेरा रेडी आहे ना?’ उमेश.

‘हो.’ मी.

मी आधीपासून माझ्या कॅनन कॅमेऱ्याला १००-३००ची झूम लेन्स लावूनच तयारच होतो.

आधी मी माझ्या (चष्म्यासकट) साध्या डोळ्यांनी त्या ऑस्प्रेला पाहून घेतलं. माझी गेल्या दोन वर्षीपासूनची त्याला पाहायची इच्छा पूर्ण होत आली होती, फक्त त्याला कॅमेऱ्याने व्यवस्थित टिपायचे होते.

त्यानंतर मी लगेच १००-३०० मिलीमीटरची लेन्स सेट करून डोळय़ाला लावली व ‘झूम-इन’ केलं.

मघाशी उघडय़ा डोळय़ांनी ‘कावळा’ वाटणारा तो ऑस्प्रे ऊर्फ ‘मासेमार’ पक्षी किती आकर्षक वाटत होता ते माझे मला ठाऊक! त्या ऑस्प्रेच्या पायात एक मासा त्याने अडकवून ठेवला होता. शिकारी पक्ष्यांच्या पायांच्या बोटांना मोठय़ा व्यासाची अणकुचीदार नखे असतात. त्याच्याही पायांना ती होती. पण तो उंच पोलवर असल्याने व्यवस्थित दिसत नव्हता.

त्या ऑस्प्रेच्या एका पायात अडकवलेला मासा त्याने माशाचा तोंडाकडचा अर्धा भाग खाऊन संपविलेला होता.

पोलवर बसलेल्या त्या ऑस्प्रेला कॅमेऱ्याने मी टिपले. पण माझ्या शटरच्या आवाजाने तो सावध झाला आणि लगेचच त्याने उडण्याची ‘पोझिशन’ घेतली.

आणि अगदी ‘स्टाइल’मध्ये त्या पोलवरून उड्डाण केले.

आहा! काय मस्त होते त्याचे उड्डाण! पंख वर केलेले आणि आकाराचा ‘चिलापी’ मासा. भीमा नदीच्या पात्रात हा गोडय़ा पाण्यातला मासा, हे ऑस्प्रेचे भक्ष्य!

नंतर त्याने तेथून उड्डाण केले. त्यानंतर तो परत संध्याकाळचे पाच वाजेपर्यंत अजिबात दिसला नाही.

पण दुपारी भोजनोत्तर विश्रांती घेऊन आम्ही परत संध्याकाळी चार वाजता होडी काढली आणि उमेश मला दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेला.

सुदैवाने तेथेही फार उशिरा, म्हणजे जवळ जवळ सूर्य मावळतीला गेला होता त्यावेळेस या पक्ष्याचे परत दर्शन झाले.

पण तो एका पाण्यातल्या झाडाच्या बोडक्या दांडीवर गप्प बसला होता. अर्थात मला तो ‘गप्प’ वाटला तरी त्याची दरारा दाखविणारी, भीती घालणारी भेदक नजर काहीतरी शोधत होती.  ‘गप्प’ वाटणाऱ्या त्या  खतरनाक डोळय़ांच्या ‘व्हीलन’च्या डोक्यात काय चाललंय, याचा थांगपत्ता लागत नव्हता. तो गरगरा मान इकडून तिकडे वळवी, त्याची ती अणकुचीदार चोच तो उघडे. आतली जीभ बाहेर काढी अन् आम्हा दोघांकडे भेदक नजरेने बघत राही.

मी त्याला नीट टिपले. सूर्यप्रकाश नसल्याने एवढी मजा आली नाही. पण तो छानपैकी माझ्या कॅमेऱ्यात ‘हमेशा के लिये’ बंदिस्त झाला! हेही नसे थोडके!!

(लेखमाला समाप्त)

Email : pneenad@gmail.com

चूकभूल

‘अशी पाखरे येती..’ या लेखमालेत दि. ११ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘पाकोळीच्या स्वैर भराऱ्या..’ या लेखासोबतचे छायाचित्र पाकोळी पक्ष्याचे नाही. ते छायाचित्र ‘ऑस्प्रे’ या पक्ष्याचे असून आजच्या लेखात म्हटल्याप्रमाणे विजेच्या तारेवरून उड्डाण घेताना प्रस्तुत लेखकाने हे छायाचित्र टिपले आहे.