How Black Coffee Improve Liver Health : सकाळची सुरुवात चहा आणि कॉफीने करणे हा दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. चहापेक्षा ब्लॅक कॉफी हा पर्याय अत्यंत फायदेशीर मानला जातो. कारण- कॉफी तुम्हाला दिवसाची सुरुवात ऊर्जेने करण्यास मदत करते. पण, हे खरं आहे का? तर दिवसाची सुरुवात ऊर्जेने करण्याबरोबरच कॉफी तुम्हाला अनेक फायदेसुद्धा देते. तर त्याच फायद्यांबद्दल या बातमीतून जाणून घेऊ…
ब्लॅक कॉफी दूध, कॉफी अन् साखरेशिवाय बनवली जाते. त्यामुळे तिचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत; विशेषतः यकृतासाठी. यकृत हा मानवी शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचा अवयव. खरं तर संपूर्ण शरीर ज्या चयापचय क्रियेवर अवलंबून असतं, त्याचं काम सांभाळणं ही यकृताची जबाबदारी असते. जेव्हा आपण शरीरासाठी घातक अशा पदार्थांचं, पेयांचं सतत सेवन करतो; त्यामुळे काही वर्षांमध्येच यकृत निकामी होऊ शकते. त्यामुळे यकृताच्या आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे असते.
… तर ब्लॅक कॉफी तुमच्या यकृतासाठी कशी फायदेशीर ठरते आणि तुम्ही त्याचे किती सेवन केलं पाहिजे ते जाणून घेऊ…
यकृताचे कार्य – ब्लॅक कॉफी यकृतातील एंझाइमची पातळी वाढवते, ज्यामुळे रक्तातील विषारी पदार्थ फिल्टर करण्याची यकृताची क्षमता सुधारते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, नियमित कॉफी पिणाऱ्यांमध्ये अॅलानाइन एमिनोट्रान्सफेरेज (ALT)सारख्या एंझाइमची पातळी निरोगी असते, जी यकृताच्या योग्य कार्यासाठी महत्त्वाची ठरते.
लिव्हर सिरोसिसचा धोका – लिव्हर सिरॉसिस झाल्यामुळे यकृताचे काम मंदावते आणि शरीरावर विविध विपरीत परिणाम होतात. त्यामुळे नियमित ब्लॅक कॉफीचे सेवन केल्याने हा धोका ६५ ते ८० टक्क्यांनी कमी होतो.
यकृताचे नुकसान – कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि दाहकविरोधी संयुगे असतात, जी यकृताची जळजळ आणि फायब्रोसिस कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे अल्कोहोल, विषारी पदार्थ किंवा चरबी जमा होणाऱ्या यकृताच्या पेशींचे संरक्षण होते.
यकृताच्या कर्करोगाचा धोका – कॉफी पिणाऱ्यांना यकृताच्या कर्करोगाचा धोका ४० टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले आहे. हे मुख्यतः कॉफीमधील संयुगांमुळे होते, जे यकृताच्या विषारी पदार्थांना काढून टाकून पेशींच्या दुरुस्तीला मदत करतात.
नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) – ब्लॅक कॉफी यकृतात जमा झालेली चरबी जमा कमी करण्यास मदत करू शकते. NAFLD चयापचय वाढवतात आणि इन्सुलिन प्रतिरोध करण्यात प्रतिबंध घालतात.
तुम्ही किती कॉफी प्यावी?
अनेक अभ्यासांमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, यकृताच्या आरोग्यासाठी तुम्ही दररोज दोन ते चार कप ब्लॅक कॉफी पिऊ शकता. सकाळी उठल्यानंतर किंवा अगदी संध्याकाळी तुम्ही या कॉफीचे सेवन करू शकता. पण, चार ते पाच कपांपेक्षा जास्त प्रमाणात कॉफी प्यायल्यास चिंता किंवा निद्रानाशासारखे दुष्परिणाम होऊ शकतात हेसुद्धा लक्षात ठेवा.