Diabetes People How To Include Corn In Their Diet : पावसाचा हंगाम सुरु झाला आहे. तसेच या दिवसात धो-धो कोसळणाऱ्या पावसात लिंबू-मीठ लावून भाजलेली कणसं (स्वीटकॉर्न) खाणं, हा अनेकांच्या आवडतीचा पदार्थ आहे. सूप, कॉर्न चाट, कॉर्न पकोडे, किंवा अगदी उकडलेले मक्याचे दाणे खाणे सुद्धा आपल्याला भरपूर आवडते. बघायला गेलं तर मक्यापासून बनवलेले सगळेच पदार्थ खूप आरामदायी असतात. पण, जर तुम्ही मधुमेहाने ग्रस्त असाल तर तुमच्यासाठी मका खाणे सुरक्षित आहे का? तुमच्या रक्तातील साखरेवर त्याचा परिणाम होतो का? याबद्दलच बातमीतून जाणून घेऊयात…
पोषणतज्ज्ञ दीपाली अरोरा यांच्या मते, मक्याचे कणीस कमी प्रमाणात आणि योग्य स्वरूपात खाल्ले तर तो मधुमेहींसाठी एक पौष्टिक आहार ठरू शकतो. कारण मक्याचे कणीस फायबर, आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे. जर तुम्हाला मधुमेह असेल आणि तुम्हाला आहारात मक्याचे कणीस खायचा आनंद घ्यायचा असेल तर फक्त रोज तुम्ही किती प्रमाणात सेवन केलं पाहिजे याची एक मर्यादा ठेवा.
तुम्ही कशाप्रकारे मक्याचे सेवन केलं पाहिजे?
प्रक्रिया केलेले कॉर्न निवडण्याऐवजी, तुमच्या जेवणात ताजा मका समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही मका ग्रिल करू शकता, उकडून घेऊ शकता, किंवा सॅलड आणि भाजीच्या स्वरूपात सुद्धा खाऊ शकता. त्यामुळे तुम्हाला संतुलित आणि निरोगी नाश्ता मिळेल. तसेच तुम्ही घरी मक्याचे कोणतेही पदार्थ घरी सहजपणे बनवू शकता किंवा ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवरून ऑर्डर देखील करू शकता.
मधुमेहासाठी भातापेक्षा मका चांगला आहे का?
मधुमेह असलेल्या लोकांसाठी, मका हा भातापेक्षा चांगला पर्याय असू शकतो कारण त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते आणि रक्तातील साखरेच्या पातळीवर त्याचा परिणाम कमी होतो. दीपाली म्हणतात की, फायबर कार्बोहायड्रेट्सचे पचन आणि शोषण कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढू शकते.
मधुमेही व्यक्तींनीं आहारात मका कसा समाविष्ट करावा?
१. मका उकडून किंवा भाजून खा. त्यावर लिंबाचा रस पिळा आणि थोडी कोथिंबीर किंवा ओवा तुम्ही टाकू शकता.
२. तुम्ही मक्याचे दाणे सॅलड, भाज्या किंवा परतलेल्या भाज्यांमध्ये घाला आणि त्यात चिकन, मासा यासारखे चरबी कमी असलेले प्रोटीन घालून पौष्टिक, चविष्ट जेवण तयार करा.
३. तुम्ही सूप बनवताना बेस म्हणून मका देखील वापरू शकता. त्यात भाज्या, कडधान्ये, चरबी कमी असलेले प्रोटीन जसे की, चिकन आणि मासा घालून सूप बनवा. यामुळे सूप भरपूर पौष्टिक होईल. जर तुम्हाला स्वयंपाक करण्याच्या कंटाळा आला असेल तर नसाल तर तुम्ही अशाप्रकारचे मक्याचे सूप ऑनलाइन ऑर्डर देखील करू शकता.
४. मक्याचा आणखी एक स्वादिष्ट प्रकार म्हणजे तो बेल पेपर, झुकीनी, गाजर अशा मिसळलेल्या भाज्यांसोबत भाजून खाणे. भाज्यांमध्ये चव आणण्यासाठी त्यावर हर्ब्स आणि मसाले घालायला विसरू नका.