अॅपलच्या आयफोन X चे प्री-बुकींग ज्यांनी केले होते त्यांना हा फोन मिळण्यास सुरुवात झाली असून या फोनबाबत ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या फोनमध्ये असणारी आकर्षक फिचर्स ग्राहकांना भुरळ घालत आहेत. मात्र फोनची किंमत खूप जास्त असल्याने अनेकांच्या तो आवाक्या बाहेर आहे. त्यामुळे कंपनीने एक अनोखी शक्कल लढवली आहे. एक लाखांहून अधिक किंमत असलेला हा फोन कंपनीने ग्राहकांना कमी किंमतीत उपलब्ध करुन दिला आहे, तोही २६,७०० रुपयांत. त्यामुळे ज्यांना आयफोनची क्रेझ आहे ते किंमत आवाक्यात आल्याने हा फोन खरेदी करु शकतात.

‘रिलायन्स जिओ’च्या माध्यमातून हे शक्य होणार आहे. ही एक ‘कॅशबॅक ऑफर’ आहे. यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. आता काय आहेत या नेमक्या अटी? तर फोन घेतल्यानंतर तो तुम्हाला कंपनीला परत करावा लागणार आहे. ग्राहकांना या फोनमध्ये रिलायन्स जिओचे सिमकार्ड वापरावे लागणार आहे. इतकेच नाही तर दर महिन्याला ग्राहकांना जिओचे ७९९ रुपयांचे रिचार्ज करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. या ७९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज ४ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळेल.

काय आहे ‘कॅशबॅक ऑफर’?

हा आयफोन X खरेदी करताना सुरुवातीला ग्राहकांना फोनची पूर्ण म्हणजेच १ लाख २ हजार इतकी किंमत भरावी लागेल. एक वर्षानी फोन परत केल्यानंतर ६५,३०० ग्राहकांना परत मिळणार आहेत. या अनोख्या कॅशबॅक ऑफरमुळे ग्राहकांना हा फोन घेण्याची हौस भागवता येऊ शकते. जिओच्या साईटवर हा फोन घेता येऊ शकतो.