How to Grow Curry Leaf Plant Fast: भारतीय स्वयंपाकघरात अनेक मसाले वापरले जातात, जे जेवणाची चव तर वाढवतातच; पण आरोग्यासाठीही त्या फायदेशीर असतात. त्यापैकी एक म्हणजे कडीपत्ता. कडीपत्त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि अनेक पोषक घटक असतात. अशा या बहुगुणी व फायदेशीर कडीपत्त्याचं अनेकांच्या घरी झाड असतं; तर काही लोक गरजेनुसार तो विकत घेतात. तुमच्याकडे कडीपत्त्याचं रोप आहे; पण ते काही केल्या छान फुलत नाहीये? पानं येत असली तरी नाजूक, पिवळी व वाळलेली? कुठलंही खत घातलं तरी काही फरक पडत नाहीये? अशी सर्व तुमच्या रोपाची स्थिती असेल, तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण- एका व्हिडीओतून समोर आलीय अशी जबरदस्त माहिती, जी वाचून आणि वापरून तुम्ही तुमच्या कडीपत्त्याचं रोप अगदी हिरवेगार आणि डेरेदार करू शकता– तेही फक्त दोन घरगुती उपायांनी आणि कोणत्याही रासायनिक खताशिवाय.
कडीपत्त्याचं रोप लावणं जितकं सोपं वाटतं, तितकीच त्याची योग्य निगा राखणं महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा आपण हे रोप टेरेस किंवा बाल्कनीत लावतो. कारण- कडीपत्त्याशिवाय फोडणी अधुरीच वाटते. पण रोप व्यवस्थित वाढत नसेल, तर नैसर्गिक खतं आणि योग्य पद्धत वापरणं गरजेचं आहे.
पहिला उपाय ताक
‘ताक’ म्हणजे अगदी घरगुती सुपरफूड! आणि हेच ताक कडीपत्त्याच्या रोपासाठीही अमृतासमान आहे. ‘gardenofkavita’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर झालेल्या व्हिडीओनुसार, ताकात असलेले घटक रोपाच्या मुळांपर्यंत पोहोचून, त्याला पोषण देतात. त्यामुळे रोप अधिक मजबूत, हिरवंगार होतं.
कसा वापर करावा?
पाच भाग पाण्यात एक भाग ताक मिसळा (१:३ प्रमाण) आणि हे मिश्रण १५ दिवसांतून एकदा मुळांजवळ टाका. थोडं थोडं पानांवर शिंपडलं तरी चालेल. पण लक्षात ठेवा, कडवट, खराब ताक अजिबात वापरू नका.
दुसरा उपाय गांडूळ खत
ताकासोबतच महिन्यातून एकदा गांडूळ खत टाकणंदेखील फार उपयुक्त ठरतं. त्यामुळे मातीतील पोषणमूल्य वाढतं, आणि रोप दाट होतं आणि रोपाला अनेक फांद्या फुटतात.
कसा वापर करावा?
कुंडीतली माती थोडीशी उकरा आणि त्यात गांडूळ खत मिसळा. त्यानंतर रोपाच्या टोकं थोडीशी कापून टाका. त्यामुळे जास्त नवीन फुटवे येतात.
हे दोन उपाय नियमितपणे केले, तर तुमचं कडीपत्त्याचं रोप लगेचच हिरवंगार आणि डेरेदार होईल स्वयंपाकात विविध खाद्यपदार्थांसाठी दिली जाणारी फोडणीही नेहमीच ताज्या पानांची मिळेल.
येथे पाहा व्हिडीओ
पाहिलंत ना? कोणतंही महागडं खत न वापरतासुद्धा, फक्त ताक आणि गांडूळ खत यांसारख्या छोट्या रसायनांच्या मशागतीनंही तुमचं कडीपत्त्याचं रोपं चांगल्या रीतीनं जोम धरू शकतं.