How To Lose 12 Kg In One Month : करण कुंद्रा हा हिंदी टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय चेहरा आहे. २००९ मध्ये ‘कितनी मोहब्बत’ है या मालिकेद्वारे त्याने अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले होते. त्याने आजवर हिंदी मालिकाविश्वात काम करीत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तर, अलीकडेच करण कुंद्राने दिलेल्या एका मुलाखतीत एका महिन्यात १२ किलो वजन कसे कमी केले याबद्दल सांगितले आहे; त्याने फॅड डाएट किंवा शॉर्टकटकडे न वळता मूलभूत गोष्टींकडे लक्ष केंद्रित केले.
करण कुंद्रा डाएटबद्दल शिस्तबद्ध तर आहेच. पण, त्याचे अन्नावरही खूप प्रेम आहे. मग अशा परिस्थितीत त्याने वजन कसे कमी केले याबद्दल जाणून घेऊयात…
करण कुंद्रा वजन कमी करण्यासाठी जुन्या पद्धतींकडे वळला. अभिनेता क्रॅश डाएट (पटकन वजन कमी करायचं) किंवा इम्पोर्टेड फूड प्लॅन्स (परदेशी डाएट प्लॅन)वर विश्वास ठेवत नाहीत. कारण- भारतीय शरीराला या सगळ्या गोष्टी अजिबात शोभत नाहीत. आपली जीवनशैली इतर देशांपेक्षा वेगळी असते. म्हणून करण कुंद्रा जुन्या चालीरीतींकडे वळला. त्याने तूप खाल्ले आणि उपवासही केला. विशेष बाब म्हणजे त्याच्यासाठी ते उपयोगीही ठरले.
वजन कमी केल्यामुळे फक्त शारीरिक बदलच होत नाहीत, तर तुमच्या ऊर्जेत, तुमच्या व्यक्तिमत्त्वात, अगदी जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोनही बदलतो. तसेच काहीसे या अभिनेत्याच्या बाबतीतही घडले. “काहीही कायमचे टिकत नाही, मग ती प्रसिद्धी असो, पैसा असो किंवा यश. फक्त टिकून राहते ते आरोग्य”, असेही तो मुलाखतीत आवर्जून म्हणाला आहे.
आरोग्य पहिलं प्राधान्य
आपण जसजसे मोठे होत जातो, तसतशी जबाबदारीची जाणीवही वाढत जाते. कारण- पालक वयस्कर होत जातात आणि हळूहळू कुटुंबही वाढत जाते. त्यामुळे पहिले प्राधान्य हे आरोग्यच असले पाहिजे. या जाणिवेमुळे करण कुंद्रा स्वतःसाठीच नाही, तर त्याच्यावर अवलंबून असलेल्यांसाठीही आरोग्याबद्दल अधिक जागरूक झाला, असे त्याने मुलाखतीत आवर्जून सांगितले आहे.