Kitchen Utensils Expiry Dates : आत्तापर्यंत पदार्थ, औषध आणि मेकअप प्रोडक्ट्सना एक्स्पायरी डेट असते हे माहीत होतं. या वस्तू आपण तारीख पाहूनच खरेदी करतो. पण, तुम्हाला माहितेय का की, किचनमधील भांड्यांनाही एक्स्पायरी डेट असते? हो. वर्षानुवर्ष एकच भांड वापरणे योग्य नाही, कारण त्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. पण, किचनमधील भांडी किती दिवस वापरली पाहिजेत? ती किती वर्षांनी बदलावीत याविषयी जाणून घेऊ…

आर्टेमिस हॉस्पिटलच्या त्वचाविज्ञान विभागाच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. पूजा अग्रवाल यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, एक्स्पायरी डेट एखाद्या उत्पादनाची कार्यक्षमता आणि सुरक्षिततेची हमी देते. एका विशिष्ट तारखेनंतर ते उत्पादन वापरू नये, आरोग्यास ते हानिकारक ठरू शकते हे सांगते.

त्यामुळे किचनमधील कोणतीही वस्तू, भांडं खरेदी करताना त्यावरील लेबल्स नीट वाचा, त्यावरील स्टोरेज सूचना बारकाईने लक्षात घ्या, कारण तुम्ही चुकीच्या पद्धतीने एखादं भांडं वापरलं तर त्याची शेल्फ लाईफ एक्स्पायरी डेटच्या आधीच कमी होऊ शकते. एखादं नवीन भांडं वापरण्यास सुरुवात केल्यानंतर त्याची शेल्फ लाईफ हळूहळू कमी होते. छापील तारीख काहीही असो, त्यामुळे भांडी नीट वापरली पाहिजेत. तुम्ही त्या भांड्याच्या पॅकेजिंगवरील बारीक अक्षरात लिहिलेल्या सूचना नेहमी नीट वाचत जा, असेही डॉ. अग्रवाल पुढे म्हणाल्या.

शेफ अनन्या बॅनर्जी यांनी किचनमधील कोणती भांडी किती वर्ष वापरली पाहिजेत, याविषयी माहिती दिली आहे.

१) नॉन-स्टिक फ्राईंग पॅन – दर २-५ वर्षांनी बदला.

त्यावरील कोटिंग निघताच पदार्थ चिकटू लागतो.

२) लाकडी चमचा – दर १-२ वर्षांनी बदला
जर लाकडी चमचा तुटला असेल किंवा त्याला वास येत असेल तर बदलला पाहिजे.

३) प्लास्टिक कटिंग बोर्ड – दर १-२ वर्षांनी बदला.
सतत वापरून त्यावर मोठ्या चिरा गेल्या असतील, प्लास्टिकचे तुकडे निघत असतील किंवा रंग बदलला असेल तर तो वापरणं बंद केलं पाहिजे.

४) सिलिकॉनचा चमचा – दर २-४ वर्षांनी बदला
जर त्याल तडे गेले असतील किंवा उष्णतेमुळे कडा वितळल्या असतील किंवा खूप मऊ झाले तर ते फेकून दिले पाहिजे.

५) स्पंज/स्क्रबर – दर २-४ आठवड्यांनी बदला
जर भांडी घासण्याच्या स्क्रबरला वास येऊ लागला किंवा तो फाटला असेल तर बदलला पाहिजे.

६) बटाटे सोलण्याचं भांडं- दर १-२ वर्षांनी बदला
बटाटा किंवा इतर कोणतेही पदार्थांची साल काढून पीलरची धार कमी झाली असेल किंवा त्याचे हँडर खूप खराब झाले असेल तर नवीन खरेदी करावे.

७) चाकू – दर ५-१० वर्षांनी बदला
जर ब्लेड तुटला असेल, वाकला असेल किंवा त्याची धार कमी झाली असेल तर तो बदलला पाहिजे.

८) खिसणी- दर ३-५ वर्षांनी बदला
जेव्हा पाते निस्तेज होतात किंवा गंजतात तेव्हा नवीन खिसणी खरेदी करायला हवी.

९) प्लास्टिकचे डब्बे- दर १-३ वर्षांनी बदला
जर किचनमधील प्लास्टिकच्या डब्ब्यांवर खूप चिकट, घाणेरडे डाग जमा झासे असतील, त्यांना खूप उग्र वास येत असेल तर ते बदलले पाहिजेत.

ज्या डब्ब्यांवर PET, HDPE किंवा PP दर्शविणारे चिन्ह असेल असे डब्बे निवडा. PVC किंवा PS असे चिन्हे असलेले डब्बे अन्नपदार्थ साठवण्यासाठी खरेदी करणं टाळा.

१०) लाकूड चॉपिंग बोर्ड – दर २-३ वर्षांनी बदला
जेव्हा त्यावर काळपट बुरशी दिसू लागते, वास येतो आणि त्यावर मोठे तडे दिसतात तेव्हा नवा चॉपिंग बोर्ड खरेदी करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

थोडक्यात काय, तर किचनसाठी कोणतंही भांडं किंवा वस्तू खरेदी केल्यानंतर त्यावरील लेबल नीट वाचा. स्टोरेज सूचनांचे नीट पालन करा. ते भांडं वापरण्यास सुरुवात केल्यापासून त्याचा शेल्फ लाइफमध्ये होणाऱ्या बदलांकडे लक्ष द्या. लेबलवरील एक्स्पायरी डेटपर्यंतच त्या वस्तू वापरा, त्यानंतर वापरू नका. अशी काळजी घेतल्यास विविध आरोग्य समस्या टाळू शकता.