कामाच्या आणि जेवणाच्याही अनियमित वेळा, धावपळीचे दैनंदिन आयुष्य, बदलती जीवनशैली, जेवणाच्या अनियमित वेळा, जागरण, बदललेले आहाराचे स्वरूप यांमुळे अपचन किंवा अॅसिडिटीचा त्रास होणे हा अनेकांच्या दिनक्रमाचाच भाग बनला आहे. आम्लपित्त किंवा हायपर अॅसिडिटी होऊन छातीत जळजळणं हा सध्याच्या धावपळीच्या जीवनात जवळजवळ प्रत्येकाला छळणारा विकार असतो. अनेकदा रुग्ण ‘अॅसिडिटी होतेय’ हीच तक्रार घेऊन डॉक्टरकडे येतात. पण या तक्रारीत खास अॅसिडिटीचा त्रास आहे की दुसरे काही आहे हे डॉक्टरला शोधून काढावं लागतं. आपल्या आजूबाजूच्या अनेकांना हा त्रास होत असतो.छातीतील जळजळ प्रत्येकाने कधी ना कधी तरी अनुभवलेली असतेच असते, तर काही व्यक्तींची ती कायम सोबती असते. आपल्या आजूबाजूला कुटुंबात, शेजारीपाजारी अनेक जण यामुळे त्रस्त असतात. कुणाला जळजळतं, तर कुणाला मळमळतं, कुणाचे यामुळे डोके दुखते तर कुणाचे पोट दुखत असते. कधी खूप ढेकर येतात किंवा तोंडामध्ये कडवटपणा येतो. जळजळ होण्याची अनेक कारणे आहेत. त्यातील प्रमुख कारण म्हणजे अॅसिडिटी किंवा आम्लपित्त. त्यामुळे अॅसिडिटी म्हणजे काय, हा त्रास कुणाला व का होतो, त्यावर इलाज काय, हा त्रास टाळता येईल का, याबद्दल आपण जाणून घेऊ.
अॅसिडिटी म्हणजे नेमके काय?
आपल्या पोटात म्हणजे जठरात एक पाचक रस तयार होत असतो. तो अॅसिडिक म्हणजे आम्लयुक्त असतो. आपण जेवलेल्या अन्नाच्या पचनासाठी या पाचक रसाची अत्यंत गरज असते, पण योग्य प्रमाणात. हाच पाचक रस जर जास्त प्रमाणात निर्माण झाला किंवा अवेळी (म्हणजे जेवणाच्या वेळेव्यतिरिक्त) तयार झाला तर आम्लपित्ताचा त्रास होतो. यालाच अॅसिडिटी असे म्हणतात.
‘अॅसिडिटी’ का होते?
पोटात जास्त प्रमाणात आणि अवेळी हा ‘आम्लयुक्त पाचकरस’ तयार होण्याची महत्त्वाची कारणे म्हणजे worry, hurry, curry. आयुष्य हल्ली वेगवान झाले आहे.
सकाळी न्याहरी करण्यासाठी वेळ नसतो. मग नुसताच चहा, कॉफी इ. पेयं घेतली जातात. ज्यामुळे पोटातील अॅसिड किंवा आम्लपित्त वाढते व अॅसिडिटी जाणवू लागते.
धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण विविध मानसिक ताणाखाली वावरत आहे. अभ्यास, करिअर, कार्यालयातील कामाचा तणाव, कौटुंबिक ताणतणाव इत्यादी कारणांमुळे मज्जासंस्थेवर परिणाम होत असतो आणि त्यामुळे जठररसाची निर्मिती जास्त प्रमाणात होत राहते. अॅसिडिटीची सुरुवात होते.
भूक लागली की रस्त्यात उभे राहून वडापाव, पावभाजी, पिझ्झा, पाणीपुरी, दाबेली इत्यादी फास्टफूड खाण्याकडे कल वाढत आहे. यातून अमिबीयासिस किंवा जियारडिआसिस सारखे संसर्ग होतात आणि यामुळे देखील अॅसिडिटी (gastritis) चा त्रास होतो.
प्रमुख कारणे
- रात्री भरपेट जेवून तात्काळ झोपणे.
- रात्री खूप उशिरा झोपणे.
- बदलीच्या नोकऱ्यांमुळे पुरेशी झोप न होणे. अपुऱ्या झोपेमुळेही अॅसिडिटी बळावते.
- मद्यपान करणे.
- अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी इत्यादी कारणांसाठी वेदनाशामक औषधे सातत्याने घेणे.
- आहारात अतितेलकट, तिखट, जळजळीत मसाल्याचे पदार्थ घेतल्यानेही अॅसिडिटी वाढते.
- अतिकडक उपवास किंवा उपवासाच्या पदार्थाच्या सेवनानेही अॅसिडिटीचा त्रास होतो.
- शिळे अन्न खाल्ल्याने पोटातले आम्लपित्त वाढते आणि अपचन झाल्याने ढेकर येतात.
- भुकेपेक्षा दोन घास कमी खावेत हा आयुर्वेदाने सांगितलेला मूलमंत्र लक्षात ठेवावा. भुकेपेक्षा अधिक खाल्ल्यानेही आम्लपित्त वाढते आणि आंबट ढेकर येतात.
लक्षणे
- जळजळ, आम्लपित्त पोटाच्या वरच्या भागात किंवा छातीत जळजळ होणे ही अॅसिडिटीची मुख्य लक्षणे आहेत. काहीही तिखट किंवा तेलकट जास्त खाल्ल्यास जळजळ होते. जेव्हा जठरात किंवा आतडय़ात व्रण (अल्सर) असतो, तेव्हा प्रभावी उपाययोजना करून जळजळ नाहीशी होते. जर व्रण नसेल तर त्याला वैद्यकीय भाषेत नॉन अल्सर डीस्पेप्सिया म्हणतात. म्हणजे लक्षणे तर अल्सरची आहेत, पण एन्डोस्कोपी केल्यास अल्सर नाही. अशा रुग्णांना वारंवार हा त्रास सतावतो.
- काही वेळा जेवताना किंवा जेवणानंतर जठरातील आम्ल घशात येऊन, अन्ननलिकेत जखमा होतात.
- जठरात विशिष्ट जंतूंचा संसर्ग झाल्यास अॅसिडिटी बळावते आणि अल्सर किंवा काही गाठीसुद्धा येण्याचा संभव असतो.
- हृदयविकाराचा झटका, पित्ताशयातील खडे, पित्ताशयाची सूज, स्वादुपिंड दाह इत्यादी अनेक कारणे असण्याची शक्यता असते. या दुखण्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास धोकादायक ठरू शकते.
-डॉ. अविनाश सुपे