हीरो मोटोकॉर्पने Hero Pleasure ही भारतातील आपली सर्वाधिक लोकप्रिय Scooty बंद करण्याचा निर्णय घेतलाय. कंपनीने या Scooty चं प्रोडक्शन थांबवलं असून डिलर्सकडूनही या Scooty साठी बुकिंग घेतले जात नसल्याची माहिती आहे. कंपनीने ही Scooty आपल्या वेबसाइटवरुनही हटवली आहे, त्यामुळे या Scooty चा  भारतीय रस्त्यांवरील 14 वर्षांचा प्रवास संपला असे मानले जात आहे.

फर्स्ट-जनरेशन Pleasure स्कूटर 2006 मध्ये Hero Honda सोबतच्या भागीदारीअंतर्गत Hero Honda Pleasure नावाने लाँच झाली होती. लॉचिंगनंतर अल्पावधीतच ही Scooty महिलांमध्ये कमालीची लोकप्रिय ठरली होती. मार्केटमधील त्यावेळेच्या टीव्हीएस स्कूटी पेप, कायनॅटिक जिंग आणि बजाज स्पिरिटी यांसारख्या स्कूटर्सपेक्षा एक पाऊल पुढे होती. अन्य स्कूटर्समध्ये जवळपास 80cc क्षमतेचं इंजिन होतं, तर प्लेजरमध्ये 102cc क्षमतेचं इंजिन देण्यात आलं होतं.

पण, हळूहळू बाजारात 110cc क्षमतेच्या स्कूटरची क्रेझ वाढली. 102cc इंजिन क्षमतेपेक्षा 110cc क्षमतेच्या स्कूटर घेण्याला ग्राहक प्राधान्य देत असल्याने गेल्या काही वर्षांपासून Hero Pleasure ची मागणी कमी झाली होती, ग्राहकांच्या कमी प्रतिसादामुळे कंपनीने प्रोडक्शनही घटवले होते. त्यानंतर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कंपनीने गेल्या वर्षी 110cc क्षमतेची Pleasure Plus ही नवीन Scooty बाजारात आणली आहे. त्यामुळे फर्स्ट-जनरेशन प्लेजर स्कूटरची जागा घेण्यासाठी कंपनीकडे आता नवीन Pleasure Plus आली आहे. नव्या स्कूटरची किंमत जवळपास जुन्या स्कूटरइतकीच आहे, शिवाय जुन्या स्कूटरला मागणी कमी असल्याने Hero Pleasure चा भारतीय रस्त्यांवरील 14 वर्षांचा प्रवास संपण्याची शक्यता वर्तवली जात आहे.