दिवस अखेर खूप थकवा येतो?हवामान बदलले की लगेच तुम्हाला सर्दी, खोकला, ताप येतो? पोटभर खाऊन तुम्हाला वजन कमी करायचेय?तुमचा चेहरा मेकअप केल्याशिवाय चमकत नाही?सकाळी उठल्यावर पोट साफ होत नाही? या त्रासांना तुम्ही वैतागलेले असाल, तर त्यावर एकच उपाय आहे. दोन्ही वेळेच्या जेवणात किमान अर्धी वाटी पालेभाजी खा. पालेभाजी हा एक असा अन्नघटक आहे, की तो आजच्या बहुसंख्य तरुण-तरुणींना आहारात आवडत नाही. पण लक्षात घ्या की आजारी पडून औषधे घेणे आणि अशक्तपणा घालवण्यासाठी इंजेक्शन्स, टॉनिक्स घ्यायला लागण्यापेक्षा आपल्या भोजनाच्या ताटातला एक कोपरा पालेभाजीला द्या आणि फरक पहा. पाहूयात विविध पालेभाज्यांच्या गुणधर्मांना….

पालक- लोह आणि कॅल्शियम असल्यामुळे रक्तवाढीला आणि हाडे बळकट व्हायला उपयुक्त असते. ज्यांचे पोट वारंवार बिघडते त्यांना तर ही गुणकारी ठरते.

environmentalist initiative to fill dry water bodies for wildlife
उरण : वाढल्या उन्हाच्या झळा, वन्यजीवांसाठी भरला पाण्याचा तळा
mango face mask for summer
उन्हाळ्यात फळांचा राजा घेईल तुमच्या थकलेल्या चेहऱ्याची काळजी! पाहा घरगुती मँगो फेस मास्क DIY
dharashiv lok sabha marathi news
धाराशिवमध्ये अपक्षा हाती तुतारी, संभ्रम दूर करण्याचे महाविकास आघाडीसमोर आव्हान
Beer companies face dry day due to water shortage
पाणीटंचाईमुळे बिअर कंपन्यांवर ‘ड्राय डे’चे सावट

मेथी- मधुमेही व्यक्तीसाठी अत्यंत उपयुक्त असते. भूक आणि अन्नपचन सुधारते, पोटात गॅसेस होत नाहीत.

चाकवत- तापात किंवा अशक्तपणामुळे तोंडाची चव गेली असल्यास चाकवत तोंडाला चव आणते. अॅसिडिटीमुळे छातीत जळजळ होत असल्यास उपयुक्त.

शेपू- गॅसेस, लहान मुलांची पोटदुखी,जंत कृमी मुलींमध्ये अनियमित मासिक पाळीसाठी.

माठ- लाल आणि हिरवा अशा दोन प्रकारात मिळणाऱ्या या भाजीने कृश व्यक्तींचे वजन योग्य प्रमाणात वाढते. आम्लपित्त नियंत्रित होते. तांबडा माठ रक्तवर्धक असतो.

अळू- या भाजीची पाने आणि देठ दोन्ही वापरली जातात. यांमुळे रक्त वाढ होते आणि मलावरोध दूर होतो. प्रसूती झालेल्या स्त्रियांमध्ये दूध कमी येत असल्यास अळूची भाजी द्यावी.

करडई- उष्मांक कमी असल्याने स्थूल व्यक्तींना वजन नियंत्रणासाठी उपयोगी. तांदुळजा- या भाजीचे सेवन डोळ्यांचे विकार, खाज सुटणे, मलावरोध यासाठी उपयुक्त. वयोवृद्ध व्यक्ती, बाळंतीण, गरोदर स्त्रिया यांना खास उपयोगी.

मुळा- कच्चा कोवळा मुळा हा मलमूत्राच्या विकारांवर, तर थोडा जून झालेला पण कच्चा मुळा सलाड म्हणून खाल्ला तर मूळव्याध, पोटातले गॅसेस धरणे, अपचन या पोटाच्या तक्रारी दूर होतात.

अंबाडी- चवीला आंबट लागणाऱ्या या भाजीत क जीवनसत्व आणि खनिज पदार्थ भरपूर असतात. यामुळे प्रतिकारशक्ती वाढून सतत सर्दी खोकला होणे कमी होते.

घोळू – ही वेगळ्या चवीची बुळबुळीत भाजी यकृताचे कार्य सुधारून अन्नपचन करते. पालेभाज्यांचा समावेश आहारात नियमितपणे असावा आणि किमान अर्धा ते एक वाटी रोज खावी. मात्र त्या स्वच्छ धुवूनच वापराव्या. शिजलेल्या भाज्यांचे पाणी टाकून देऊ नये, ते पीठ मळण्यासाठी वापरावे.

(लेखक डॉ.अविनाश भोंडवे, फॅमिली फिजिशियन आहेत.)