How to store lemon in fridge: भारतातील जवळजवळ प्रत्येक घरात लिंबू वापरले जाते. जेवणाची चव वाढवण्यासाठी किंवा सरबत, लोणचं बनवण्यासाठी वापरण्याव्यतिरिक्त लिंबू अनेक घरगुती कामांसाठीदेखील वापरले जाते. पोटॅशियम, लोह, व्हिटॅमिन बी ६, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स पोषक तत्वांनी समृद्ध असलेले घटक लिंबामध्ये आढळतात, ज्यामुळे लिंबू आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. परंतु, लिंबू जास्त काळ टिकत नाहीत. फ्रिजमध्ये ठेवल्यानंतरही ते सुकतात. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला लिंबू जास्तीत जास्त दिवस साठवण्याचा चांगला मार्ग कोणता हे सांगणार आहोत.
लिंबू जास्त दिवस साठवण्यासाठी मार्ग
चांगले लिंबू निवडा
जर तुम्ही भरपूर लिंबांची खरेदी करत असाल आणि ते साठवून ठेवू इच्छित असाल तर खरेदी करण्यापूर्वी नेहमीच त्यांची गुणवत्ता तपासा. बाजारातून चांगली लिंबू निवडण्यासाठी, प्रथम त्यांचा रंग, आकार आणि वजन तपासा. लिंबू गडद किंवा पिवळे नसून हलक्या हिरव्या रंगाचे असावे. ते सामान्य आकाराचेदेखील असावेत आणि हातात घेतल्यास कठीण आणि जड असावेत. लिंबाची साल संपूर्ण, डाग नसलेली आणि चमकदार असावी. डाग नसलेली, सैल किंवा फुटलेली सालं असलेली लिंबू खरेदी करू नयेत. साठवणुकीसाठी नेहमी ताजी लिंबू खरेदी करावी.
लिंबू कसे साठवायचे?
लिंबू साठवण्यासाठी प्रथम एका मोठ्या भांड्यात ती बुडण्याइतके पाणी घ्या, आता त्यात एक चमचा किंवा दोन चमचे व्हिनेगर घालून लिंबू १० मिनिटे भिजवा. १० मिनिटांनंतर सर्व लिंबू बाहेर काढा आणि स्वच्छ आणि कोरड्या कापडाने पुसून टाका. आता ही लिंबू सुमारे १५ मिनिटे उन्हात ठेवा. यामुळे सर्व पाणी व्यवस्थित सुकेल. त्यानंतर, लिंबू उन्हातून काढून टाका आणि हाताने लिंबावर स्वयंपाकाच्या तेलाचे दोन-तीन थेंब लावा, यामुळे लिंबांवर पातळ थर तयार होईल. आता सर्व लिंबू हवाबंद काचेच्या डब्यात ठेवा आणि ते बंद करा. हे डबे फ्रिजमध्ये ठेवल्याने ते एक ते दोन महिने सहज टिकेल. तसेच जर तुम्ही ते फ्रीजरमध्ये ठेवले तर ते ४ ते ५ महिने टिकू शकतात.
लिंबू धुण्यासाठी व्हिनेगर वापरल्याने लिंबाचा वरचा थर स्वच्छ होतो, यामुळे सर्व जंतू नष्ट होतात. त्यावर तेल लावल्याने लिंबावर एक संरक्षक थर तयार होतो. यामुळे बाहेरील जीवाणू लिंबावर जामण्यापासून रोखले जातात. फ्रिजमध्ये ठेवलेले लिंबू वापरण्यासाठी, लिंबू बाहेर काढा आणि ते गरम पाण्यात १० मिनिटे बुडवा. लिंबू मऊ होताच तुम्ही ते वापरू शकता.