Liver Disease Symptoms: लिव्हरचे आजारपण हळूहळू वाढत जाते आणि जेव्हा कळते तेव्हा स्थिती गंभीर होऊ शकते. म्हणून जर तुम्हाला लिव्हरच्या आजाराचे लक्षण दिसले तर लगेच डॉक्टरांकडे तपासणी करा. त्याचबरोबर निरोगी जीवनशैली आणि संतुलित आहार घेतल्यास लिव्हर बराच काळ निरोगी राहू शकते. जर लिव्हर नीट काम करेनासं झालं तर शरीरात अनेक आजार एकामागोमाग सुरू होतात. साधारणपणे लोक थकवा, अपचन किंवा त्वचेवर झालेले छोटे बदल याकडे दुर्लक्ष करतात. पण, हे संकेत लिव्हरशी संबंधित गंभीर आजाराचे लक्षण असू शकतात.

लिव्हर स्पेशलिस्ट डॉक्टर शिवकुमार सरीन यांच्या मते, चुकीचा आहार आणि बिघडलेली जीवनशैली लिव्हरची तब्येत खराब करत आहे. जर तुम्हाला निरोगी लिव्हर हवे असेल तर तुमच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. तज्ज्ञांच्या मते, वेळेत लक्षण ओळखून योग्य पावले उचलली तर लिव्हरला होणारे मोठे नुकसान टाळता येऊ शकते. चला तर मग, लिव्हर खराब होण्याची पाच मुख्य लक्षणे आणि त्यापासून बचावाचे उपाय जाणून घेऊया.

सतत थकवा आणि कमजोरी

दररोज नीट झोप घेतल्यानंतरही दिवसभर थकवा आणि कमजोरी वाटत असेल तर ही साधी समस्या नाही, हे लिव्हर नीट काम करत नाही याचे लक्षण असू शकते; कारण जेव्हा लिव्हर शरीरातील घातक द्रव्ये बाहेर काढू शकत नाही, तेव्हा शरीराची ऊर्जा कमी होऊ लागते.

डोळे आणि त्वचा पिवळी होणे

लिव्हर खराब होण्याचे मोठे आणि सामान्य लक्षण म्हणजे डोळे व त्वचा पिवळी होणे. डोळ्यांची पांढरी जागा आणि त्वचा पिवळी दिसायला लागली तर त्याला कावीळ (जॉन्डिस) म्हणतात. हे लक्षण आहे की लिव्हर शरीरातून बिलिरुबिन नीट बाहेर टाकू शकत नाही, अशावेळी लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

पोटात दुखणे आणि सूज येणे

लिव्हर नीट काम करत नसल्याने तब्येतीला अनेक त्रास होऊ शकतात. लिव्हरच्या समस्येमुळे पोटाच्या वरच्या भागात दुखणे किंवा जडपणा जाणवू शकतो. याशिवाय, लिव्हर खराब झाल्यामुळे कधी कधी पोट फुगणे आणि सूज येण्याचीही समस्या होऊ शकते.

उलट्या आणि मळमळ

लिव्हरमध्ये काहीही समस्या झाली तर सतत उलटी आणि मळमळ होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, जर सतत मळमळ आणि उलटी होत असेल आणि काहीही खाल्ल्यावर पोटात पचत नसेल, तर हे लिव्हर खराब होण्याची लक्षणे असू शकतात. याकडे दुर्लक्ष करू नये आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

त्वचेवर खाज आणि फोड येणे

लिव्हर खराब झाल्यावर त्वचेतही लक्षण दिसू लागतात. लिव्हरच्या आजारांमुळे शरीरात पित्त साठू लागते, ज्यामुळे त्वचेवर खाज, फोड आणि लालसरपणा यांसारख्या समस्या होऊ शकतात. कावीळ (जॉन्डिस) आणि डोळे व त्वचा पिवळी होणे हे लिव्हर खराब होण्याची गंभीर लक्षणे आहेत.

लिव्हर कसे निरोगी ठेवावे

  • तेलकट आणि जंक फूड टाळा.
  • दारू आणि धूम्रपानापासून दूर राहा.
  • दररोज व्यायाम आणि योग करा.
  • पुरेसे पाणी प्या.
  • आहारात हिरवा भाजीपाला, ताजी फळे आणि सॅलेड खा.