महागाईचा फटका आता मॅगीलाही बसला आहे. नेस्ले इंडियाने मॅगीच्या छोट्या पॅकच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ग्राहकांना १२ रुपयांऐवजी १४ रुपये मोजावे लागणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि नेस्लेनेही चहा, कॉफी आणि दुधाच्या किमती वाढवल्या आहेत. खर्च वाढ झाल्याने ही किंमत वाढवण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. वाढीव दराची अंमलबजावणीही सोमवारपासून करण्यात आली आहे.

नेस्ले इंडियाच्या म्हणण्यानुसार कंपनीने मॅगीच्या किमती ९ ते १६ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दूध आणि कॉफी पावडरच्या दरातही वाढ करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. किंमत वाढवल्यानंतर आता मॅगीच्या ७० ग्रॅमच्या पॅकेटसाठी १२ ऐवजी १४ रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे १४० ग्रॅमच्या मॅगी मसाला नूडल्सच्या किमतीत ३ रुपये किंवा १२.५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ५६० ग्रॅम मॅगीच्या पॅकसाठी ९६ ऐवजी १०५ रुपये मोजावे लागतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कॉफी पावडरही झाली महाग

नेस्लेने ए प्लस दुधाच्या एक लिटरच्या दरातही वाढ केली आहे. आता यासाठी ७५ ऐवजी ७८ रुपये मोजावे लागणार आहेत. नेसकॅफे क्लासिक कॉफी पावडरच्या दरात तीन ते सात टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर २५ ग्रॅमचा नेसकॅफेचा पॅक आता २.५ टक्के महाग झाला आहे. यासाठी ७८ ऐवजी आता ८० रुपये मोजावे लागणार आहेत. यासोबतच नेसकॅफे क्लासिकच्या ५० ग्रॅमसाठी १४५ ऐवजी १५० रुपये मोजावे लागतील.