कचऱ्याच कलेमध्ये रूपांतर करण्याचा विचारच किती सुंदर आहे. हाच विचार घेऊन मनवीर सिंगने त्याच काम सुरु केलं आणि आता त्या कामाला त्याने आपल्या जीवनाचे ध्येय बनवले आहे. प्लॅस्टिकवाला म्हणून मनवीर सिंग या कलाकाराची ओळख आहे. त्याने २०१८ मध्ये आपल्या कामासाठी कामी न येणार प्लॅस्टिक वापरायला सुरु केलं. गेल्या ३ वर्षात या दिल्लीच्या तरुण कलाकाराने २५० किलो फेकून दिलेल्या, वापरात नसलेल्या प्लॅस्टिकला वेगळ रूप देत वापरण्याजोग तयार केलं आहे.

कसा सुरु झाला मनवीर सिंगचा प्रवास?

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना तो सांगतो की, “लँडस्केप पेंटिंग्ज तयार करताना मला लक्षात आले की, नैसर्गिक लँडस्केपचे ‘प्लॅस्टिकस्केप’ मध्ये रूपांतर होत आहे. हे रुपांतर अर्थातच नकारात्मक होते. आणि म्हणूनच निर्सगावरती कलाकृती तयार करण्यापेक्षा निसर्गासाठी कलाकृती तयार करण्याचा निर्णय मी घेतला.”

मनवीरच्या कलाकृतीचा परदेशीही मान

मनवीरच्या प्लॅस्टिकपासून बनवलेल्या ३ कलाकृती दुसऱ्या देशात विकल्या गेल्या आहेत. एक जर्मनी तर दोन अबू धाबीमध्ये कलाकृती विकल्या गेल्या आहेत. मनवीरने जानेवारी २०२० मध्ये अबू धाबी राष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, फेब्रुवारी २०२० मध्ये अबू धाबीच्या मनारत अल सादियात सांस्कृतिक केंद्र, गोवा संग्रहालय आणि अशा अनेक ठिकाणी आपल्या कलाकृती सादर केल्या आहेत.

कलाकृतीसाठी कोणत्या प्रकारचे प्लॅस्टिक वापरले जाते?

मनवीर सांगतो की, “मी कलाकृती करण्यासाठी मुख्यत: आरआयसी क्रमांक ७ असलेले एमएलपी किंवा प्लॅस्टिक वापरतो. मल्टी लेयर्ड पॅकेजिंग (एमएलपी), ज्याला मल्टी लेयर्ड प्लॅस्टिक देखील म्हणतात. ही एक अशी सामग्री आहे जी प्लॅस्टिकच्या एका थरात मुख्य घटक म्हणून कागद, कागद बोर्ड, पॉलिमरिक मटेरियल, मेटलिस्ड सारख्या साहित्याच्या जागी वापरली जाते.”

प्लॅस्टिक वापरणे किती आव्हानात्मक आहे?

“ज्याला कॅनव्हासवर काम करण्यास शिकवले गेले आहे अशा व्यक्तीसाठी, प्लॅस्टिकसह काम करणे सुरुवातीला आव्हानात्मकच होते. तेल, अॅक्रेलिक रंग आणि इतर माध्यमांचा कलाकृती बनवण्यासाठी कसा उपयोग करावा हे आपल्याला शैक्षणिक पद्धतीने शिकवले जाते. पण प्लॅस्टिकचा माध्यम म्हणून वापर करणे एक आव्हान आहे. हे प्लॅस्टिक माध्यम म्हणून वापरण्यासाठी मी खूप चाचण्या केल्या. त्यात काही त्रुटीसुद्धा आल्या. तसेच प्लॅस्टिक कचरा गोळा करण्याचेही आव्हान होते. सुरुवातीला प्लॅस्टिक कचरा मिळवण्यासाठी मी खूप संघर्ष केला.” असं मनवीर सांगतो.