milk benfits: दूध हा नेहमीच आरोग्यदायी आहाराचा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. प्रोटीन, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक घटकांनी समृद्ध असलेले दूध, मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी फायदेशीर मानले जाते. अनेक लोकांसाठी दूध हाडं मजबूत करण्यासाठी, शरीराच्या पोषणासाठी आणि इतर आरोग्यदायी फायदे देण्यासाठी आदर्श पर्याय मानले जाते. परंतु, प्रत्येकासाठी दूध सारखे फायदेशीर असते असे नाही. काही लोकांसाठी दूध हे आरोग्यविषयक समस्यांचे कारणही ठरू शकते.
दुधाचे फायदे आणि धोके
दुधामध्ये प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन डी आणि इतर सूक्ष्म पोषक घटक असतात, जे हाडे तयार करण्यास मदत करतात आणि सामान्य आरोग्यासाठी फायदेशीर असतात. परंतु, दूध हे सर्वांसाठी फायदेशीर आहे असे म्हणता येत नाही. काही संशोधनानुसार जास्त दूध सेवनामुळे प्रोस्टेट कर्करोगाचा धोका वाढू शकतो, पुरळ होऊ शकते. आणि काही वेळा लहान मुलांमध्ये लोहाची कमतरता होऊ शकते. तसेच, फूल-फॅट दूध व इतर पूर्ण फॅट दुग्धजन्य पदार्थांमुळे संतृप्त चरबी वाढते, ज्यामुळे हृदयासंबंधी धोके निर्माण होऊ शकतात. काही लोकांना लॅक्टोज इन्टॉलरन्स, दुधातील प्रथिनांवरील अॅलर्जी किंवा पचन व त्वचेच्या समस्यादेखील होऊ शकतात. दुग्धजन्य पदार्थांचे मध्यम सेवन हृदयरोग, स्ट्रोक, मेटाबॉलिक सिंड्रोम, टाइप २ मधुमेह आणि काही कर्करोगांपासून संरक्षण करू शकते.
कोणासाठी दूध टाळणे किंवा कमी करणे आवश्यक आहे
१. लॅक्टोज इन्टॉलरंट लोक :
ज्यांना लॅक्टोज (दुधातील साखर) पचवता येत नाही, त्यांना दूध प्यायल्यावर पोट फुगणे, गॅस किंवा जुलाब यांसारख्या समस्या जाणवू शकतात. अशा लोकांनी काळजी घ्यावी किंवा पर्यायी उपाय शोधावे. त्यासाठी लॅक्टोज-फ्री दूध किंवा सोया, बदाम, ओट यांसारखे वनस्पतीजन्य दूध वापरणे सोयीचे ठरेल.
२. दुधाच्या प्रथिनांची अॅलर्जी असलेले लोक :
काही प्रौढांमध्ये दुधाच्या प्रथिनांमुळे अॅलर्जी होऊ शकते, ज्यामुळे त्वचेवर पुरळ उठणे, सूज येणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. अशा लोकांसाठी दूध पूर्णपणे टाळणे सर्वात सुरक्षित आहे.
३. हृदयरोगाचा धोका असलेले किंवा जास्त चरबीयुक्त पदार्थांचे सेवन करणारे लोक :
फूल-फॅट दूध, क्रीम, चीज आणि बटरमध्ये संतृप्त चरबीचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे एलडीएल (वाईट) कोलेस्ट्रॉल वाढते. हृदयरोगाचा धोका असलेल्या लोकांनी कमी चरबीयुक्त दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचा वापर करणे चांगले.
४. विशिष्ट कर्करोगाचा धोका असलेले लोक :
संशोधनातून असे दिसून आले आहे की, जास्त दुधाचे सेवन प्रोस्टेट कर्करोगाच्या थोड्याशा जोखमीशी संबंधित आहे. उच्च धोका असलेल्या लोकांनी ते किती दूध पितात हे निश्चित करण्यासाठी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
५. मुलांमध्ये लोहाची कमतरता :
दुधाचे जास्त सेवन केल्याने मुलांमध्ये लोहाची कमतरता निर्माण होऊ शकते. पालकांनी दुधासोबत लोहयुक्त पदार्थ द्यावेत किंवा फोर्टिफाइड दूध वापरावे.
६. पचन किंवा प्रतिकारशक्ती कमी असलेले लोक व कच्चे दूध सेवन करणारे :
कच्चे दूध (पाश्चराइज्ड नसलेले) हे साल्मोनेला, ई. कोलाय आणि लिस्टेरियासारख्या हानिकारक जीवाणूंनी दूषित होऊ शकते. गर्भवती, वृद्ध किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्या लोकांनी कच्चे दूध टाळावे आणि फक्त पाश्चराइज्ड दूधच वापरावे.
जर तुम्ही दूध सहन करू शकत असाल तर दररोज १-२ कप (सुमारे २०० मिली) पुरेसे आहे. हृदयरोगाचा धोका असलेल्या लोकांनी कमी चरबीयुक्त किंवा स्किम्ड दूध निवडावे. शेवटी, आपल्या शरीराची प्रतिक्रिया लक्षात घ्या – पोटातील त्रास, त्वचेवर बदल किंवा इतर आरोग्यासंबंधी चिन्हे दिसल्यास दूध सेवन कमी करणे आवश्यक आहे.
