Monsoon Gardening Plants : पावसाळ्यात डास, मच्छर आणि लहान कीटकांची संख्या दिवसेंदिवस खूप वाढताना दिसते. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे डासांची पैदास वेगाने सुरू होते. या डासांमुळे पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांचा धोकाही वाढतो. अशावेळी अनेक घरांत डासांना पळवण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. दारे-खिडक्यांना जाळी बसवली जाते, जेणेकरून डास घरात शिरणार नाहीत. विविध कीटकनाशकांचा वापर केला जातो, पण त्यानेही तात्पुरता फरक पडतो. पण, तुम्ही काही नैसर्गिक पद्धतींचा वापर करून डासांना घरापासून दूर ठेवू शकता. यासाठी तुम्हाला बाल्कनीत काही रोपं लावावी लागतील. या रोपांच्या मदतीने तुम्ही डासांना घरापासून दूर ठेवू शकता.
१) लेमनग्रास / सिट्रोनेला ग्रास
सिट्रोनेला या रोपाला लिंबूसारखा तीव्र वास येतो, ज्यामुळे या वासानेच डास पळून जातात. या रोपामध्ये एक तेल असते, जे बहुतेकदा मेणबत्त्या आणि स्प्रेमध्ये वापरले जाते. डासांना नैसर्गिकरित्या दूर ठेवण्यासाठी हे रोप घरात किंवा बाहेर ठेवता येते. या रोपाच्या वासामुळे डासांसह लहान कीटकही घरापासून दूर राहतात.
२) लॅव्हेंडर
लॅव्हेंडरमध्ये लिनालूल आणि लिनालिल एसीटेट असते, ज्याचा वास डासांना अजिबात आवडत नाही. डासांना दूर ठेवण्यासाठी आणि घरात गोड सुगंध पसरवण्यासाठी तुम्ही हे रोप खिडक्या किंवा लिव्हिंग रुममध्ये लावू शकता. यामुळे सौंदर्य आणि सुरक्षितता दोन्ही वाढते.
३) कॅटनिप
कॅटनिपमध्ये नेपेटालॅक्टोन असते, जे डासांना दूर ठेवण्यास मदत करते. ते केवळ डासांनाच नाही तर इतर अनेक कीटकांनादेखील दूर करते. हे रोप तुम्ही घरातही सहज ठेवू शकता.
४) तुळस
लेमन तुळस किंवा लाइम तुळस जिचा सुगंध तीव्र असतो जो डासांना दूर ठेवतो. या रोपाचा ताजा प्रभाव हवादेखील ताजी ठेवतो. याचा वापर स्वयंपाकातदेखील करता येतो.
५) रोझमेरी
रोझमेरी डास आणि इतर कीटकांना दूर ठेवते. तुम्ही ते घरी सौंदर्य किंवा त्वचेची काळजी घेण्यासाठीदेखील वापरू शकता. हे रोप घराच्या बाल्कनीत लावल्यास त्याच्या वासामुळे डास घराच्या आजूबाजूलाही फिरकत नाही.