नमस्कार मंडळी, या जेवायला असं म्हणत महाराष्ट्रातील घरोघरी पोहचलेल्या प्रसिका या व्हायरल कपलने अलीकडेच रानभाज्यांच्या पाककृतींवर एक व्हिडीओ बनवला होता. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. पावसाळयात रानभाज्यांचा अस्सल पारंपरिक ट्रेंड प्रसिका या पेजच्या माध्यमातून तब्बल तीन लाखाहून अधिक जणांपर्यंत पोहचला आहे. आज आपण या रानभाज्यांचे काही प्रकार आणि त्याचे आरोग्यासाठीचे फायदे जाणून घेणार आहोत. तसेच या भाज्या विकत घेताना व वापरताना कोणती काळजी घ्यावी हे ही पाहणार आहोत.

पावसाळ्याच्या महिन्यात बाजारात अनेक प्रकारच्या रानभाज्या येतात. यांची नावं तशी फास्टफूड प्रेमींना मजेशीर वाटू शकतात पण चवीला या भाज्या खरोखरच लज्जतदार असतात. तुमच्या पाककौशल्याप्रमाणे आपण याची वडी, भजी, खिचडी, आमटी किंवा अगदी सॅलेड बनवूनही खाऊ शकता. कुर्डू, सातधारी/ श्रावण भेंडी, टाकळा, शेवगा, अळू, अंबाडी, कंटोळे, काटेमाठ अशा काही भाज्यांचे प्रकार तुम्हाला बाजारात सहज मिळू शकतात.

१. कंटोळी

कंटोळी ही रानभाजी डोंगराळ भागात आढळते. याला कंटोळा असेही म्हणतात. ही रानभाजी दिसायला कारल्यासारखी पण लहान असतात. ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे.डोकेदुखीवर कंटोळी अत्यंत गुणकारी आहेवजन संतुलित ठेवण्यासाठी या फायबरयुक्त भाजीची मदत होतेहृदय विकार व मधुमेहींसाठी ही भाजी वरदान आहे तसेच. सर्दी, खोकला व तापावर सुद्धा कंटोळी उपाय ठरतात.

२. टाकळा

ही वनस्पती प्रामुख्याने पावसाळ्यात उगवते. ही भाजी पडीक किंवा ओसाड जमीन, शेतात, बागांमध्ये, जंगलात, रस्त्याच्या कडेने कुठेही वाढते. अनेक घरांमध्ये जन्माष्टमीच्या दिवशी टाकळ्याची भाजी आवर्जून केली जाते. पित्त, अ‍ॅलर्जी, सोरायसिस, खरूज या त्वचाविकारांवर टाकळ्याची भाजी जादूप्रमाणे काम करते.
जंत झाल्यावर टाकळ्याचे सेवन पोटाला आराम देते. लहान मुलांना दात येताना जेव्हा ताप येतो तेव्हा या टाकळ्याच्या पानांचा काढा द्यावा, ताप नियंत्रणात राहतो.

३. काटेमाठ

ही भाजी पावसाळ्यात ओसाड जमिनीवर किंवा रस्त्याच्या कडेली या भाज्या वाढतात. या वनस्पतीला सप्टेंबर ते नोव्हेंबर मध्ये फुले येतात. नवमातांच्या अंगावरील दूध वाढण्यास मदत होते. पित्त, मूळव्याध, रक्तविकार यावर सुद्धा काटेमाठ औषधी आहे.

प्रसिकाने कसा केला रानभाज्यांचा बेत

४. आघाडा

या वनस्पतीची मुळे, पाने,फळे औषधात वापरतात. तुम्हाला युटीआय म्हणजेच लघवी संबंधित व्याधी असल्यास आघाड्याची भाजी आवर्जून खाऊन पहा. वात व पित्ताचा त्रास, अतिरिक्त वजन कमी करण्यास आघाडा मदत करते.

५. अंबाडी

अंबाड्याच्या भाजीत अनेक व्हिटॅमिन आणि प्रोटीन असल्याने केसगळतीवर ही भाजी परिणामकारक ठरते. अंबाड्याच्या भाजीत हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असणारा कॅल्शिअम मुबलक असतो यामुळे ऑस्टिओपोरोसिस आजारापासून आपले रक्षण होते.

रानभाज्या या आरोग्यासाठी गुणकारी असल्या तरी त्या विकत घेताना त्यांची पाने विशेष तपासून घ्या. या भाज्या पावसात ओसाड रानावर उगवत असल्याने अनेकदा कुसून जातात त्यामुळे विना तपासता खरेदी करू नका. घरी आणल्यावर या भाज्यांना स्वच्छ पाण्याने धुवून काढा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(सूचना: ही माहिती गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारीत आहे यास वैद्यकीय सल्ला समजू नये.)