तेजश्री गायकवाड – response.lokprabha@expressindia.com
सुट्टीच्या दिवशी बाइक काढून फिरायला जाणं हा तरुणाईचा आवडता उद्योग. ही बाइक राइड करताना पेहरावही तसाच हवा. तरच तुम्ही हटके आणि यो दिसाल.
मे महिना म्हणजे जगजाहीर सुट्टीचा महिना. या महिन्यात फिरायचे, खेळायचे, सिनेमाला जायचे असे अनेक कार्यक्रम ठरतात. वर्षभर एकाच ठिकाणी राहून राहून आपण कंटाळतो म्हणून हवापाणी बदलासाठी बाहेरगावी फिरायचे प्लान तर आवर्जून होतातच. त्यातल्या त्यात एक अफाट प्लान सध्या जास्त ट्रेण्डिंग आहे तो म्हणजे बाइक राइडला जायचा.
एखादं ठिकाण ठरवायचं, बॅग पॅक करायची आणि निघायचं. अनेकदा अशा ट्रीप एकटय़ाने केल्या जातात. कधी ग्रुपनेही केल्या जातात. अशा वेळी तुम्ही तुमच्या बाइकची चांगली काळजी घेता. बेस्ट बाइक निवडता. मग या सोबत बेस्ट बाइक रायडिंग लुकही निवडायला हवाच की! तुमची बाइक रायडिंगची ट्रीप एकदम फॅशनेबल होण्यासाठी बाइक रायडिंग लुकविषयी टिप्स देत आहे.
हेल्मेट्स :
सुरक्षितता सगळ्यात महत्त्वाची. म्हणूनच तुमच्या लुकमधला महत्त्वाचा भाग आहे हेल्मेट. ही सुरक्षिततेबरोबरच बाइक रायडिंग लुक पूर्ण करण्यासाठी सगळ्यात गरजेची वस्तू. हेल्मेट्समध्ये खूप प्रकार असतात. फुल फेस हेल्मेट, हाफ हेल्मेट , मॉडय़ूलर अर्थात फ्लिप-अप हेल्मेट, ओपन फेस किंवा थ्री-फोर्थ हेल्मेट, ऑफ रोड हेल्मेट किंवा मोटोक्रॉस हेल्मेट, स्पोर्ट्स हेल्मेट. एवढय़ा प्रकारच्या हेल्मेटमधून तुम्ही कोणता पर्याय निवडणार? सोप्पं आहे. तुम्ही कोणत्या ठिकाणी जाताय आणि कोणत्या प्रकारच्या रोडने जाताय यानुसार तुम्ही कोणत हेल्मेट घालावं हे ठरवावं. हेल्मेट फक्त काही अपघात झाला तरच आपल्याला वाचवते असं नाही. ऊन आणि वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी त्याचा उपयोग होतोच. त्यामुळे लांबच्या प्रवासासाठी फुल फेस हेल्मेट हा उत्तम पर्याय आहे. तुमच्या हेल्मेटचा रंग नेहमी ब्राइट असायला हवा म्हणजे तो रस्त्यावर दिवसा-रात्री कधीही सहज दिसू शकतो. सगळ्या नीऑन रंगाच्या शेड, फ्रेश ऑरेंज, ग्रीन असे सगळे रंग सध्या ट्रेण्डिंग आहेत.
आयवेअर :
डोळे हा आपल्या शरीराचा नाजूक भाग आहे. त्यामुळे त्याचं रक्षण करायला हवं. कुठल्याही रोडवरून जाताना, कोणत्याही हवामानात बाइक चालवताना डोळ्यांची काळजी घ्यायलाच हवी. बाजारात खास बाइक रायडिंगसाठी ग्लासेस मिळतात. जे डोळ्यात अगदी बाजूनेही कोणतीही कचरा जाऊन देत नाहीत. तुम्ही फुल फेस हेल्मेट घातलं असेल तर तुम्हाला गॉगलची गरज नाही. पण बाकीच्या कोणत्याही प्रकारच्या हेल्मेटच्या आतून गॉगल घातलाच पाहिजे. बाजारात रात्री वापरता येतील असेही काही गॉगलचे प्रकार उपलब्ध आहेत. त्यामुळे रात्रीही बाइक रायडिंगचा आनंद तुम्ही घेऊ शकता. गॉगल घेताना शक्यतो ब्रॅण्डेड आणि यू.व्ही. प्रोटेक्शन असलेले घ्यावेत. आणि रायडिंगच्या वेळी नेहमी गॉगलच्या एकाहून जास्त जोडय़ा ठेवणं चांगलं. गडद रंगाचे गॉगल जास्त ट्रेण्िंडग आहेत आणि गडद रंगच जास्त उपयुक्त आहेत. वेगवगळ्या प्रकारचे हे गॉगल ऑनलाइन मार्केटमध्येही उपलब्ध आहेत.
ग्लोव्ह्ज :
बाइक चालवताना ग्रिपसाठी ग्लोव्ह्ज तर हवेच. रोज जवळच्या ठिकाणी बाइक चालवायला ग्लोव्ह्जची शक्यतो गरज लागत नाही. परंतु लांबच्या प्रवासाला ग्लोव्ह्ज हवेतच. ग्लोव्ह्ज निवडताना तुम्ही कोणत्या ठिकाणी जाताय हे महत्त्वाचे आहे. थंड ठिकाणी की कडक उन्हाच्या ठिकाणी जाताय यानुसार म्हणजे तिथल्या हवामानानुसारच ग्लोव्ह्ज निवडले गेले पाहिजेत. लेदरचे ग्लोव्ह्ज, फिंगरलेस ग्लोव्ह्ज, मोटो-क्रॉस ग्लोव्ह्ज, गौंटलेट ग्लोव्ह्ज (Gauntlet), ऑफ-रोड मोटरसायकल ग्लोव्ह्ज, स्ट्रीट ग्लोव्ह्ज, समर क्रूझिंग (Cruising) ग्लोव्ह्ज, विंटर मोटरसायकल रायडिंग ग्लोव्ह्ज असे अनेक प्रकारचे ग्लोव्ह्ज बाजारात उपलब्ध आहेत. सगळ्या परिस्थितीचा विचार करून ग्लोव्ह्ज निवडा.
फुटवेअर :
बाइक रायडिंगला जाताना पायात बूटच वापरावेत. बुटांची उंची व्यवस्थित तुमच्या पायाच्या घोटय़ापर्यंत असणे गरजेचे आहे. बुटाला अगदी थोडी आणि न घसरणारी हिल्स असावी. बूट आपले कोणत्याही हवामानापासून, रस्त्यावरच्या गरमीपासून संरक्षण करतात. काही रायडर जवळच्या किंवा लांबच्या रायडिंगला रग्ड हायकिंग बूट (rugged hiking) किंवा साधे वर्क बूट घालतात. रायडिंग बूट हाही एक चांगला पर्याय आहे कारण या बुटाच्या अॅकल, टो एरियाजवळ आणि हिल्सच्या इथे सॉफ्ट फोम वापरलेला असतो. बूट विकत घेतानाही शक्यतो चांगल्या कंपनीचे, चांगल्या बॅ्रण्डचेच घ्यावेत. नाही तर मोठय़ा प्रवासावेळी भर रस्त्यावर प्रॉब्लेम होतो. या बुटांमध्ये नेहमीचे वर्षभर ट्रेण्डमध्ये असणारे रंग म्हणजे काळा, ब्राऊन, मरून, हिरवा हे रंग आहेत.
जॅकेट्स :
जॅकेट्सची निवड करतानाही बाकीच्या गोष्टीप्रमाणेच कुठे जाणार, कोणत्या रस्त्याने जाणार आणि तिथले हवामान कसे आहे यानुसार निवड करावी. खास रायडिंगसाठी बाजारात जॅकेट्स उपलब्ध आहेत. ती नाही घेतली तरी कोणत्याही परिस्थितीत रक्षण करेल अशा मटेरियलची निवड मात्र करा. कोणत्याही सिझनमध्ये रायडिंगला जाणाऱ्यांकडून वॉटरप्रूफ जॅकेट्सला मागणी जास्त असते. कारण हवामानाचा अंदाज अनेकदा आपल्याला बांधता येत नाही. जाड लेदर फॅब्रिकसारखी केवलार फॅब्रिकपासून बनवलेली जॅकेट्स जास्त उपयुक्त असतात. बाकीच्या फॅब्रिकपेक्षा या मटेरीयलपासून बनवलेली जॅकेट्स आपलं जास्त चांगलं रक्षण करतात. जॅकेट्स निवडताना गडद रंगाचीच निवड करावी कारण हे रंग पटकन दिसून येतात. जॅकेट्स शक्यतो गळाबंद असावीत. अशा जॅकेट्सला जास्तीतजास्त करून झिपर किंवा वेल्क्रो असतो. त्यामुळे जॅकेट्स पटकन घालायला, काढायला मदत होते. काही जॅकेट्सच्या आतून वॉर्म फॅब्रिक किंवा अस्तरही लावलेलं असतं. ते आपलं थंडीपासून रक्षण करतं. काही मोठय़ा ब्रॅण्डच्या जॅकेट्समध्ये आता नवीन डिझाइन्स पाहायला मिळत आहेत. त्यात खांद्यावर, हाताच्या कोपरावर वरून हार्ड आणि आतून सॉफ्ट अशाप्रकारचं फॅब्रिक वापरून डिझाईन केलेलं आहे. त्यामुळे अपघात झाला तर त्याठिकाणी कमी मार लागतो.
पॅन्टस :
लोअर गार्मेंटमध्ये फुल पॅन्ट् वापरावी. जेणेकरून आपण टॉप टू एन्ड पूर्णपणे झाकले जाऊ. पॅन्टसमध्ये तुम्ही अगदी रोजच्या वापरातले हलके कपडेही वापरू शकता. लेदर, केवलार आणि वेगवगळ्या सिन्थेटिक मटेरियलपासून बनवलेल्या खास रायडिंगसाठी बनवलेल्या पॅन्ट्स बाजारात आहेत. त्या तुमचं कोणत्याही परिस्थितीत उत्तम रक्षण करतात. काही पॅन्ट्समध्ये गुडघ्याच्या आणि घोटय़ाच्या ठिकाणी हार्ड प्लास्टिकचा वापर केलेला असतो. तुम्ही पॅन्ट्समध्ये कम्फर्टेबल असाल तर अगदी जाड डेनिम जीन्सचाही वापर करू शकता. ती तुमचं वाऱ्यापासून रक्षण करेल.
सौजन्य – लोकप्रभा