बापू बैलकर

शहरी असो की ग्रामीण रस्ते, महामार्ग असो की डोंगर उतार आणि खडतर रस्ते असो की चिखलमय.. कुठेही चालवता येईल असा एक बहुपर्याय नुकताच टाटा मोटर्सने वाहन खरेदीदारांसाठी उपलब्ध करून दिला आहे तो ‘पंच’ या पहिल्या छोटय़ा एसयूव्हीच्या माध्यमातून. सर्वच परिस्थितीत टाटाची ही पंच चालवून पाहण्याचा अनुभव आम्ही घेतला असता ती ग्राहकांच्या या सर्व अपेक्षा पूर्ण करताना दिसते. काही बाबतीत थोडी निराशा होते, मात्र किमतीचा विचार केला याकडे दुर्लक्ष करता येऊ शकते.

ऑक्टोबर २०२१ मध्ये टाटाने आपल्या या बहुप्रतीक्षित कार पंचची घोषणा केली. करोनाकाळातही सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झालेले असताना एसयूव्ही प्रकारांतील कारला ग्राहकांनी डोक्यावर घेतले होते. मात्र या प्रकारातील कारच्या किंमती या दहा लाखांपेक्षा अधिक होत्या. त्यानंतर २०२१ हे वर्षे मध्यम आकारातील एसयूव्हींनी गाजवले. यात मॅग्नाइट, कायगर, सोनेट या कार बाजारात आल्या. त्यानाही ग्राहकांनी चांगली पसंती दिली. मात्र एक मोठा वर्ग असा होता की त्यांना एसयूव्हीच (म्हणजे आधुनिक सुविधा असलेली कार) खरेदी करायची आहे, मात्र किमतींचा विचार केला तर ती परवडत नव्हती. याचा विचार करून टाटाने ऑक्टोबर महिन्यात आपली पंच ही पहिली छोटी एसयूव्ही बाजारात आणत तिची किंमत ही ५.४९ लाखांपासून पुढे एक्स शो रूम जाहीर केली.

मात्र टाटाने ही कार बाजारात आणताना फक्त किंमत डोळ्यासमोर न ठेवता ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता कशी करता येईल यावर भर दिला. यात ही कार मॅन्युअल (एमटी) व ऑटोमॅटिक (एएमटी) ट्रान्समिशन पर्यायांसोबत ग्राहकांच्या वैविध्यपूर्ण जीवनशैलीला अनुसरून प्युअर, अ‍ॅडवेन्चर, अकॉम्प्लीश व क्रिएटिव्ह या ४ विशिष्ट वैशिष्टय़ांमध्ये उपलब्ध करून दिली. त्यात कंपनीने किमान व साधेपणाचे कौतुक करणाऱ्या, तसेच कोणत्याही जटिलतांशिवाय कार्यक्षमतेला पसंती देणाऱ्या ग्राहकांचा विचार करीत प्युअर हा पर्याय दिला. तर साहसी कृत्यांसोबत लांबच्या प्रवासाची आवड असणाऱ्यांसाठी अ‍ॅडव्हेन्चर हा दुसरा पर्याय दिला. तर शहरी भागातील ग्राहकांचा विचार करीत अ‍ॅकम्प्लीश हा तिसरा तर सुलभपणे माहिती उपलब्ध होणे पसंत असलेल्या डिजिटलप्रेमी ग्राहकांसाठी टाटाने चौथा क्रिएटिव्ह हा पर्याय उपलब्ध करून दिला.

आशा या बहुपर्यायी टाटाच्या पंचला पदार्पणातच सुरक्षेबाबतची परीक्षा पास करीत पंच तारांकित मानांकन मिळवले आहे. त्यामुळे टाटाची पंचने पहिल्या सुरक्षा पंच दिल्याने ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात ती यशस्वी झाली असे म्हणावे लागेल. २० ऑक्टोबर रोजी ही कार बाजारात आल्यानंतर नोव्हेंबर महिन्यातील कारच्या विक्रीत पंचने पहिल्याच महिन्यात आपले स्थान आघाडीच्या पहिल्या पाच कारमध्ये मिळवले.

मॅन्युअल व ऑटोमॅटिक या दोन्ही प्रकारातील कार आम्ही विविध प्रकारच्या रस्त्यांवर चालवून पाहिल्या. खडतर मार्गावरही अनुभव घेतला.  माथेरानचा खडतर घाट असो की मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, दुर्गम भागातील खडतर रस्ते असोत की चिखलमय रस्ते..या सर्व प्रकारच्या रस्त्यांवर पंचने अगदीच निराशा केली नाही की असुरक्षितता वाटली नाही. आरामदायीपणा, प्रगत इन्फोटेन्मेंट व संपन्न कनेक्टीव्हीटीसह उत्साहपूर्ण कार चालविण्याचा आनंद मिळाला. ‘टॉर्क’बाबत थोडा अपेक्षाभंग झाला तर मध्यम वेग असताना खड्डेमय रस्त्यांची जाणीव करून दिली. सुकाणू हाताळताना थोडे कष्ट पडतात. अनेकदा रस्त्यात कारप्रेमींनी थांबवून या कारबाबत केलेली विचारणा ही पंचचे अस्तित्व अधोरेखित करून देत होती. दृष्यमानता  प्रकाश व्यवस्था चांगली आहे. आसन व्यवस्थाही आरामदायी आहे.

३० किलोमीटपर्यंतचा वेग धारण करेपर्यंत थोडी कसरत करावी लागते. वारंवार गिअर बदलावे लागतात. मात्र यानंतर मात्र ती सहज अनुभव देते. थोडा आवाजाचा त्रास जाणवतो. गिअर, क्लच बदलताना थोडे धक्के सहन करावे लागतात. ब्रेकिंग ठीक आहे. सुकाणू हाताळताना मात्र थोडे जडत्व जाणवते. घाट रस्त्यावरही तिसऱ्या गिअरवरही कार सहज चढउतार पार करते. रस्ता सोडत नाही.

छोटय़ा व वळणदार रस्त्यावरही कारवरील ताबा सुटत नाही. मॅन्युअल कार ग्रामीण व खडतर रस्त्यांवर चांगला पर्याय आह तर ऑटोमॅटिक पंच ही शहरातील रस्त्यांवर चांगला अनुभव देते. मात्र गिअर बदलताना पीकअप घेताना थोडी निराशा होते. मात्र एकदा वेग पकडला की काही अडचण येत नाही. १२० किलोमीटर वेगाने जात असलेल्या दुसऱ्या वाहनाला मागे टाकताना चौथ्या गिअरवर सहज शक्य होते.

सुरक्षित कार

कारच्या सुरक्षा तपासणीत प्रौढ व्यक्तींच्या संरक्षणासाठी अत्यंत प्रतिष्ठित ग्लोबल एनसीएपी ५-स्टार रेटिंग (१६.४५३), तर लहान मुलांच्या संरक्षणासाठी ४-स्टार रेटिंग (४०.८९१) प्राप्त केले आहेत. दोन एअरबॅग असून एबीएस, इबीडी आणि कॉर्नर स्टॅबीलीटी कन्ट्रोल या सुरक्षा प्रणाली देण्यात आल्या आहेत.

किंमत (एक्स शोरूम)

ल्ल प्युअर : ५.४९ लाख

ल्ल अ‍ॅडव्हेंन्चर : ६.३९ लाख

ल्ल अकॉम्प्लीश : ७.२९ लाख

ल्ल क्रिएटिव्ह : ८.४९ लाख