Winter beauty tips: हिवाळा सुरू झाला की सर्वात आधी त्रास होतो तो आपल्या त्वचेचा. थंड हवा, कोरडे वातावरण आणि कमी पाण्याचे सेवन; यामुळे त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसू लागते. अनेकजण हा ग्लो टिकवण्यासाठी जड मेकअपचा आधार घेतात, पण तो कायमचा उपाय नाही. खरंतर, योग्य काळजी घेतली तर मेकअपशिवायही नैसर्गिक सौंदर्य टिकवता येते. यासाठी दैनंदिन दिनचर्येत काही सोपे बदल करणे पुरेसे आहे.
१) पुरेसे पाणी पिणे
हिवाळ्यात तहान कमी लागते, पण शरीरातील पाण्याची कमतरता त्वचेवर सर्वात आधी दिसते. त्वचा कोरडी, ताणलेली आणि निस्तेज वाटते, म्हणूनच दिवसात ८–१० ग्लास पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. पुरेसे हायड्रेशन मिळाले की त्वचा आतूनच नरम आणि चमकदार राहते.
२) त्वचेला शोभेल असा मॉइश्चरायझर निवडा
हिवाळ्यात त्वचेचा ओलावा पटकन कमी होतो, म्हणून अंघोळीनंतर लगेच मॉइश्चरायझर लावणे हा एक सोपा पण प्रभावी उपाय आहे. तुमच्या त्वचेसाठी हलके पण योग्य असलेले मॉइश्चरायझर निवडा. तुमचा चेहरा फिकट दिसण्यापासून रोखण्यासाठी दिवसातून दोन ते तीन वेळा मॉइश्चरायझर लावणे उपयुक्त ठरते. योग्य मॉइश्चरायझर त्वचेवर संरक्षणाचा थर तयार करतो आणि जास्त काळ ओलावा टिकवून ठेवतो.
३) घरच्या घरी तयार करा फेस पॅक
घरी उपलब्ध असलेल्या नैसर्गिक वस्तू त्वचेला सर्वाधिक अनुकूल असतात. एलोवेरा जेल, मध आणि कच्चे दूध मिसळून तयार केलेला फेस पॅक हिवाळ्यात खूप फायदेशीर ठरतो. हा फेस पॅक आठवड्यातून दोनदा लावल्याने त्वचा मऊ, तजेलदार आणि पोषित होते.
रात्री झोपण्यापूर्वी बदाम किंवा नारळ तेलाने मालिश केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि नैसर्गिक चमक वाढते.
४) थंडी, धूळ आणि प्रदूषणापासून चेहरा सुरक्षित ठेवा
बाहेर पडताना थंड हवा त्वचेचा ओलावा आणखी कमी करते. चेहरा स्कार्फ किंवा शॉलने झाकून बाहेर जा. ओठ फाटू नयेत म्हणून पेट्रोलियम-बेस्ड लिप बाम वापरा. धूळ आणि प्रदूषणापासून संरक्षण मिळाल्यास त्वचेवरील डॅमेज कमी होते आणि स्किन हेल्दी राहते.
हिवाळ्यात नैसर्गिक सौंदर्य टिकवणे अवघड नाही, फक्त थोडी सातत्यपूर्ण काळजी घ्यावी लागते. पुरेसा पाण्याचा पुरवठा, योग्य मॉइश्चरायझर, नैसर्गिक फेसपॅक, तेल मालिश आणि चेहऱ्याचे संरक्षण हे काही छोटे उपाय त्वचेला देतात दीर्घकाळ ग्लो. मेकअप न करतादेखील तुमचे नैसर्गिक सौंदर्य सहज खुलून येऊ शकते.
