कडुलिंब आयुर्वेदातील अत्यंत महत्वाची औषधी वनस्पती आहे. आरोग्याशी संबंधित अनेक लहान-मोठ्या समस्या कडुलिंबा पासून दूर होतात. तसंच त्वचेवर देखील कडुलिंबाचा आश्चर्यकारक प्रभाव लक्षात घेता, त्वचेच्या उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात याचा वापर केला जातो. कडुनिंबामध्ये अँटी-व्हायरल, अँटी-बॅक्टेरियल आणि टॉक्सिन काढून टाकणारे गुणधर्म असतात. तर जाणून घेऊया कडुलिंबाचे फायदे आणि वेगवेगळ्या समस्यांमध्ये कडुलिंबाचा वापर कसा करायचा.
कडुलिंबाच्या पानांचे फायदे
१. शरीरात कुठेही खाज येत असेल तर कडुलिंबाची पेस्ट लावल्याने फायदा होतो. यासाठी तुम्हाला ताजी कडुलिंबाची पाने बारीक करून खाज असलेल्या भागावर लावा. यामुळे तुम्हाला खाजेपासून सुटका मिळेल.
२. फक्त त्वचाच नाही तर कडुलिंब टाळूची खाज देखील दूर करते. कडुलिंबाची पाने बारीक करून डोक्याला लावल्यास त्याचे अॅटीफंगल गुणधर्म लगेचच प्रभाव दाखवतात.
३. कोंडा झाल्यास एका पातेल्यात पाणी घालून कडुलिंबाची पाने उकळा आणि पाणी हिरवे झाल्यावर गॅस बंद करा. आता कडुलिंबाचे पाणी थंड होण्यासाठी ठेवून द्या. शॅम्पू लावल्यानंतर या पाण्याने केस धुवा.
४. कडुलिंबाचा वापर अनेक प्रकारे चेहऱ्यासाठी करता येतो. कडुलिंबाची पाने बारीक करून त्यात चिमूटभर हळद मिसळून चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचेलाही चमक येईल.
५. कडुलिंबाची पाने बारीक करून कीटक चावलेल्या ठिकाणी देखील लावता येतात. हे कीटकांद्वारे पसरणारे संक्रमण टाळेल.
६. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी कडुलिंबाची पाने बारीक करून भाजीच्या रसासोबत पिऊ शकतात.
७. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कडुलिंबाची २-३ पाने खाणे चांगले मानले जाते. ही पाने चवीला खूप कडू असतात, त्यामुळे तुम्ही ती पाण्यासोबत गिळू शकता.
८. केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येवरही कडुलिंब मदत करतो. कडुलिंबाची पावडर दररोज टाळूवर लावल्याने केस अकाली पांढरे होण्यास बंद होतात.
९. कडुलिंबाचा फेस मास्क सुरकुत्या आणि वृद्धत्व कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. कडुलिंबाची पावडर हळद किंवा बेसनासोबत लावता येते. हा फेसपॅक बनवण्यासाठी दही किंवा मधाचाही वापर केला जाऊ शकतो.
१०. हिरड्या किंवा दातांमध्ये दुखत असल्यास कडुलिंबाच्या पाण्याने गुळण्या करणे फायदेशीर ठरते. तोंडाचा वास दूर करण्यासाठीही याचा वापर करता येतो.
(येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. आवशक्यता असल्यास नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या.)