Indian kitchen storage: पूर्वीच्या काळी भारतीय घरांमध्ये तांबे, पिवळे, कासे या धातूंच्या, तसेच मातीच्या या भांड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा. परंतु. आता बदलत्या काळानुसार स्टीलची भांडी मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत. टिकाऊ आणि स्वस्त असल्याने प्रत्येक वर्गातील लोकांच्या घरी स्टीलची भांडी असतातच. परंतु, तुम्हाला ठाऊक आहे का? स्टीलच्या भांड्यांमध्ये काही पदार्थ ठेवल्यास ते लवकर खराब होऊ शकतात.
‘हे’ पदार्थ स्टीलच्या भांड्यात ठेवू नका
दही
स्टीलच्या भांड्यात दही साठवणे टाळावे. कारण- दही ही असा पदार्थ आहे, जो तयार झाल्यानंतर बरेच दिवस वापरला जातो. अशा परिस्थितीत लोक ते ज्या भांड्यात ठेवतात, त्या भांड्यात बराच काळ साठवतात. जेव्हा आपण स्टीलच्या भांड्यात बराच काळ दही ठेवतो, तेव्हा त्याची चव बदलते. म्हणून दही तयार करण्यासाठी आणि ते साठवण्यासाठी फक्त चिनी माती किंवा काचेच्या भांड्याचा वापर करावा.
लोणचे
लोणचे कधीही स्टीलच्या डब्यात ठेवू नये. कारण- लोणचे बनवण्यासाठी तेल, मसाले, मीठ, व्हिनेगर इत्यादींचा वापर केला जातो. या गोष्टी धातूशी प्रतिक्रिया देतात. जर स्टील चांगल्या दर्जाचे नसेल, तर त्याची चव बदलू शकते. म्हणून लोणच्याची कोणत्याही प्रकारची चव किंवा त्याचा गंध बिघडू नये यासाठी ते काचेच्या बरणीत भरून ठेवावे.
फळ किंवा सॅलड
बरेच लोक कॉलेज किंवा ऑफिससाठी कापलेली फळे किंवा सॅलड स्टीलच्या डब्यात साठवतात. जर कापलेली फळे किंवा सॅलड जास्त काळ स्टीलच्या डब्यात साठवले, तर ते ओलसर किंवा बेचव होऊ शकतात. ते साठवण्यासाठी तुम्ही हवाबंद काचेच्या डब्याचा वापर करू शकता.
लिंबू वापरून बनवलेले पदार्थ
स्टीलच्या भांड्यामध्ये लिंबूवर्गीय फळे ठेवू नयेत. लेमन राईस, लेमन रसम किंवा आमचूर आणि चिंच वापरलेले पदार्थ स्टीलच्या डब्यात ठेवल्यास त्याच्या चवीची तीव्रता कमी होऊ शकते.
टोमॅटोने समृद्ध असलेले पदार्थ
ज्या पदार्थामध्ये जास्त टोमॅटो वापरले जातात असे पदार्थ स्टीलच्या भांड्यात साठवू नयेत. टोमॅटोपासून बनवलेले ग्रेव्हीचे पदार्थ स्टीलशी प्रतिक्रिया देऊ शकतात, ज्यामुळे पदार्थांची चव आणि पोषक प्रभावित होते.