स्मार्टफोनच्या स्पर्धेत विस्मृतीत गेलेली नोकिया आता पुन्हा एकदा नव्याने स्पर्धेत उतरणार आहे. काही महिन्यांपूर्वी बार्सिलोनामध्ये पार पडलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये नोकियाने आपल्या पुनरागमनाची घोषणा केली. त्यानंतर सगळ्यांना नोकियाच्या लाँचिगचे वेध लागले होते. जगात काही ठिकाणी नोकियाने आपले नवे फोन गेल्याच महिन्यात लाँच केले असले तरी भारतात मात्र ते उशीरा लाँच करण्यात येणार असल्याचे नोकियाने स्पष्ट केले होते. येत्या आठ मेला होणाऱ्या एचएमडी ग्लोबल इव्हेंटमध्ये नोकिया फोनच्या लाँचिगची घोषणा करण्यात येईल, असे ‘द इंडियन एक्सप्रेस’ने सांगितले आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना येत्या जून महिन्यात नोकियाचे फोन भारतात लाँच होतील अशीही माहिती एचएमडी ग्लोबलने दिली. नोकियाच्या ३३१० बरोबरच नोकिया ६, नोकिया ५ आणि नोकिया ३ हे स्मार्टफोन देखील लाँच होणार आहेत. पण एकाच वेळी हे फोन लाँच होतील की नाही याबद्दल मात्र शंका आहे. नोकिया स्वस्त आणि परवडणाऱ्या दरात आपले तिन्ही स्मार्ट फोन लाँच करणार आहे. नोकिया ६, ५ आणि ३ या फोन्सची किंमत १० ते २० हजारांच्या आसपास असणार आहे. हे फोन जूनमध्ये लाँच होत असले तरी नंतर मात्र याची किंमत वाढू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. जीएसटीनंतर मोबाईलची किंमत वाढेल, असे अनेकांचे म्हणणे आहे. ५. ५ इंचाचा एचडी डिस्प्ले, क्वालकोम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, ३ जीबी रॅम, ३२ जीबी मेमरी, १६ मेगापिक्सेल कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा हे या नोकिया ६ चे वैशिष्ट्य आहे. तर नोकिया ५ हँडसेटचा डिस्प्ले ५.२ इंचाचा असणार आहे. २ जीबी रॅम १६ जीबी मेमरी १३ मेगापिक्सेल कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा हे नोकिया ५ चे वैशिष्ट्य असणार आहे. नोकियाच्या लाँचिगची अनेकांना उत्सुकता आहे. चीनमध्ये तर नोकिया फोनच्या लाँचिग आधीच प्रीबुकिंगला सुरूवात झाली होती. जगभरात हा फोन लाँच झाला असला तरी भारतात मात्र जूनमध्येच तो लाँच करण्यात येईल हे आता नक्की झालंय.