Warm Water For Fat Loss: पाणी हे जीवनासाठी खूप आवश्यक आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. ते केवळ तहान भागवण्यासाठीच नाही तर आपल्या महत्त्वाच्या कामांसाठी आणि रोगांचा प्रसार रोखण्यासाठी देखील महत्त्वाचे आहे. प्रत्येक कार्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते. दररोज २ ते ३ लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. थंड आणि गरम दोन्ही पाण्याचे स्वत:चे असे फायदे आहेत. व्यायामानंतर थंड पाणी शरीराला थंड करते, तर गरम पाणी विषारी पदार्थ बाहेर काढण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करते. गरम पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते असे अनेकदा म्हटले जाते. मात्र हे खरंच शक्य आहे का? नेमकं याबाबतचं तथ्य आपण जाणून घेऊ…
संशोधन काय सांगते?
काही संशोधनातून असे आढळले आहे की, जास्त पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे पाणी प्यायल्याने आपल्याला पोट भरल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे आपण कमी जेवतो. शिवाय शरीराला पोषक तत्वे उत्तमरित्या शोषून घेण्यास आणि हानिकारक पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. २००३मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, कोमट पाणी प्यायल्याने चयापचय वाढतो आणि जेवणापूर्वी ५०० मिली पाणी प्यायल्याने चयापचय सुमारे ३० टक्क्यांनी वाढू शकतो.
गरम पाणी आणि वजन कमी होणे यातला संबंध
सकाळी रिकाम्या पोटी किंवा दिवसभर कोमट पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास तीन प्रकारे मदत होऊ शकते. कोमट पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान किंचित वाढते. हे संतुलित करण्यासाठी शरीर अतिरिक्त ऊर्जा खर्च करते आणि त्यामुळे चयापचय सक्रिय होतो. कोमट पाणी शरीरातील फॅट ब्रेक करण्यास आणि त्याचे लहान रेणूंमध्ये रूपांतर करण्यास मदत करते. त्यामुळे पचनसंस्थेला ते अधिक सहजपणे बर्न करता येते. जेवणाच्या अर्धा तास आधी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने भूक कमी होते आणि कॅलरीजचे प्रमाण कमी होते.
गरम पाण्याचे फायदे
पचन सुधारते- पाणी पचनसंस्थेला वंगण घालते आणि पचण्यास कठीण असलेले अन्न विरघळण्यास मदत करते.
ताण कमी करते- कोमट पाणी मज्जासंस्था शांत करते. त्यामुळे शरीरातील वेदना आणि ताण दोन्ही कमी होतात.
बद्धकोष्ठतेपासून आराम- कोमट पाणी आतड्यांची हालचाल वाढवते.
विषारी पदार्थ काढून टाकते- गरम पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान वाढते आणि त्वचेच्या छिद्रांमधून घामाद्वारे विषारी पदार्थ बाहेर पडतात.
