सध्या बाजारपेठेत विविध कंपन्यांच्या मोबाईल फोन्सची जोरदार स्पर्धा सुरू असल्याचे दिसते. मोबाईलचा वापर आता केवळ फोन करण्यासाठी किंवा संदेश पाठवण्यापुरता मर्यादित राहिला नसून इतर फिचर्सचाही ग्राहक विचार करताना दिसत आहेत. यामध्ये मोबाईलचा कॅमेरा आणि सेल्फी फिचर्सला अधिक प्राधान्य दिले जात आहे. सध्या अनोखे सेल्फी फिचर्स असणाऱ्या ओप्पो कंपनीच्या मोबाईल फोन्सची बाजारपेठेत चांगलीच चर्चा आहे. ओप्पोकडून नुकतेच त्यांचे नवे मॉडेल लाँच करण्यात आले.

सेल्फी एक्सपर्ट अशी ओळख असलेला F 5 हा फोन अतिशय स्लीम आहे. यामध्ये फ्रंट कॅमेरासाठी ब्युटी हे फिचर देण्यात आले आहे. यामुळे तुमचा चेहरा आहे त्यापेक्षा आणखी चांगला दिसतो आणि फोटोही खूपच चांगला येतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोबाईलवरील कोणतेही बटण क्लीक न करताच यामध्ये तुमचा फोटो निघू शकणार आहे. या फोनचा बॅक कॅमेरा १६ मेगापिक्सलचा असून फ्रंट कॅमेरा २० मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. बुके इफेक्ट हा केवळ बॅक कॅमेराला असतो. मात्र, ओप्पोच्या F 5 मध्ये फ्रंट कॅमेरालाही बुके इफेक्ट देण्यात आला आहे.

६ इंचांची स्क्रीन असलेल्या या फोनला एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. यात नॅनो सिमकार्डसाठी दोन आणि मायक्रोएसडी कार्डसाठी एक असे एकूण तीन स्लॉट देण्यात आले आहेत. ४ जीबी रॅम व ३२ जीबी मेमरी आणि ६ जीबी रॅमसह ६४ जीबी मेमरी अशा दोन पर्यायांसह हा फोन उपलब्ध आहे. ही मेमरी २५६ जीबीपर्यंत वाढविता येऊ शकते. या फोनला ३२०० मिलीअॅम्पियर्सची बॅटरी देण्यात आली आहे.