ताडीमध्ये अल्प प्रमाणात अल्कोहोलचे प्रमाण असल्याने केरळमध्ये सामान्यांमध्ये ती अजूनही फारशी स्वीकारली जात नाही. मात्र आता केरळ सरकार ताडी आरोग्यवर्धक पेय म्हणून आणणार आहे. त्यामुळे कोणत्याही वयाच्या नागरिकांना त्यात लिंगभेद न ठेवता ती घेता येईल असा केरळ सरकारचा विचार आहे.

केरळ सरकार ताडी मंडळ स्थापन करणार आहे. जनतेचे ताडीबाबत जे मत आहे, ते बदलण्याचा प्रयत्न असल्याचे राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री टी.पी.रामकृष्णन यांनी स्पष्ट केले. कोणत्याही वयोगटातील नागरिकांना ताडी घेता येईल या दृष्टीने प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले. त्यासाठी विधेयक आणले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ताडी मंडळ स्थापन झाल्यावर राज्यात शुद्ध ताडी उपलब्ध होईल या दृष्टीने प्रयत्न केले जातील असे त्यांनी स्पष्ट केले. ताडीपासून इतरही उपपदार्थ तयार केले जातील असे त्यांनी सांगितले. ताडीची मागणी घटली आहे. त्यामुळे राज्य सरकारने हॉटेल्स किंवा तीन तारांकित परवानाधारक व त्याच्यावरील सर्वाना ताडी विक्रीचे धोरण जाहीर केले. मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही. भेसळयुक्त ताडीची भीती उत्पादकांच्या उदासीनतेने बार चालकांनी ताडीपेक्षा मद्याला पसंती दिली. पर्यटनस्थळी ताडी पार्लर उभारण्याची योजना असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. ताडी उद्योगाला आधार दिला तर नारळाच्या लागवडीला मोठय़ा प्रमाणात चालना मिळेल अशी उत्पादन शुल्क विभागाची अपेक्षा आहे.