लग्नसराईचे दिवस आहेत आणि अक्षयतृतीयादेखील जवळ आली आहे. साहजिकच मिठाईचे अनेक खोके घरात गोळा होतील. पूर्वी लाल-पिवळ्या नक्षीच्या साध्या खोक्यांतून मिठाई मिळत असे, मात्र गेल्या काही वर्षांत या वेष्टनांचा कायापालट झाला आहे. हलवाई आपले वेगळेपण ग्राहकांवर बिंबवण्यासाठी वेष्टनांत विविध प्रयोग करत आहेत. घरी आलेल्या मिठाईच्या खोक्यांतील जाड, सोनेरी रंगाचा आणि खाचा असलेला कागद आपण फेकून देतो. त्याचा पुनर्वापर करून दिवाळीतल्या छोटय़ा कंदिलांसारख्या लॅम्प शेड्स तयार करता येतील. मंगल सोहळ्यानिमित्त घराची सजावट करण्यासाठी या छोटेखानी लॅम्प शेड्सचा वापर केल्यास घरी येणारे पाहुणे नक्कची खूश होतील.

साहित्य

  • मिठाईचा रिकामा खोका, कात्री, पंच, सॅटिन रिबन, टिकल्या, जिलेटीन कागद, गम

कृती

  • जाड सोनेरी कागदाच्या आतील खाचा उघडून घ्या.
  • मागील बाजूस गम लावून त्यावर तुमच्या आवडत्या रंगातील जिलेटीन कागदाचे तुकडे चिकटवा
  • लॅम्प शेडच्या सर्व खिडक्या जिलेटीन कागदाने बंद करा.
  • बाहेरील बाजूला हव्या त्या रंगांच्या व आकारांच्या टिकल्या चिकटवून शेड सजवा.
  • वरील बाजूस पंच मशिन ने दोन छिद्रे पाडा.
  • सॅटिन रिबनचा बो करून चिकटवा.
  • ही शेड टेबलवर उभी करून ठेवता येईल किंवा त्यात बल्ब बांधून खिडकी वा दरवाज्यात लटकवता येईल.

apac64kala@gmail.com