ऑनलाइन व्यवहारांसाठी लोकप्रिय असलेल्या ई-वॉलेट पेटीएमचा वापर आजपासून महागणार आहे. 1 जुलैपासून पेटीएम व्यापारी सवलत दराचा(MDR) बोजा ग्राहकांवर टाकणार आहे. बँक आणि कार्ड कंपन्यांकडून डिजिटल व्यवहारांसाठी MDR आकारला जातो. अधिक नफा मिळावा यासाठी कंपनीकडून अशाप्रकारचं पाऊल उचलण्यात आल्याची शक्यता आहे.

परिणामी, क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार केल्यास 1 टक्के, डेबिट कार्डद्वारे व्यवहार केल्यास 0.9 टक्के आणि नेट बँकिंग किंवा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसद्वारे व्यवहार केल्यास 12 ते 15 रुपये आकारले जातील. आतापर्यंत व्यापारी सवलत दराचा(MDR) बोजा पेटीएम कंपनी स्वतःवर घेत होती आणि त्यासाठी अतिरिक्त रक्कम आकारली जात नव्हती. इकॉनॉमिक टाइम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

पेटीएमद्वारे केलेल्या कोणत्याही प्रकारच्या डिजिटल व्यवहारांवर म्हणजे अगदी युटिलिटी बिल, शाळेची फी किंवा सिनेमा तिकिटाच्या खरेदीवरही अतिरिक्त दर आकारले जातील. दरम्यान,  ‘बँक आणि कार्ड आकारतात त्या एमडीआरचा बोजा ग्राहकांवर टाकण्यात आला आहे. पेटीएमकडून कोणत्याही प्रकारचे सेवा शुल्क आकारले जात नाहीये, भविष्यात देखील अशी योजना नाहीये’ असं पेटीएमकडून सांगण्यात आलं आहे.