Mobile in Toilet Disease: आजकाल मोबाईल आपल्यासाठी खूप महत्त्वाचा भाग झाला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत लोक सतत मोबाईल वापरतात. एक दिवस फोन दूर ठेवला तर काहीतरी अपूर्ण असल्यासारखं वाटतं.

आजकाल लोक मोबाईल टॉयलेटमध्येही नेतात आणि तिथे बराच वेळ बसून राहतात. पण, अलीकडच्या संशोधनानुसार टॉयलेटमध्ये मोबाईल वापरण्याची सवय ही काही साधी नाही, तर ती गंभीर आरोग्य समस्या निर्माण करू शकते. अभ्यासामध्ये आढळलं आहे की, टॉयलेटमध्ये मोबाईल वापरणाऱ्यांना मुळव्याध होण्याचा धोका ४६% ने वाढतो.

मूळव्याध म्हणजे काय? (What is Piles)

मूळव्याध किंवा पाईल्स ही अशी अवस्था आहे, जेव्हा गुदद्वार आणि मलाशयातील शिरा सुजतात. प्रत्येकाच्या शरीरात नैसर्गिकरित्या “हॅमोरॉइडल कुशन” असतात, जे शौच नियंत्रित करण्यास मदत करतात. पण, जेव्हा या रक्तवाहिन्यांवर जास्त दाब येतो, तेव्हा त्या सुजतात आणि त्यातून मुळव्याध तयार होते.

मूळव्याधीची सामान्य लक्षणे (Piles Symptoms)

  • गुदद्वाराच्या भागात वेदना आणि अस्वस्थता
  • खाज
  • शौच करताना रक्तस्त्राव
  • जास्त वेळ बसल्यावर त्रास

मूळव्याध का होतो?

तज्ज्ञांच्या मते, मूळव्याध प्रामुख्याने शौच करताना जास्त जोर लावणे, टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसणे, बद्धकोष्ठता, गर्भधारणा, आहारात फायबरची कमतरता, मोबाईलचा वापर अशा कारणांमुळे होतो.

बॉस्टन येथील बेथ इस्राएल डीकॉनेस मेडिकल सेंटरच्या अभ्यासानुसार, ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या १२५ लोकांवर संशोधन करण्यात आलं, जे कोलोनोस्कोपी स्क्रीनिंग करत होते. या रिसर्चनुसार, ६६% लोक टॉयलेटमध्ये स्मार्टफोन वापरत होते. स्मार्टफोन वापरणाऱ्यांमध्ये मुळव्याध होण्याचा धोका ४६% जास्त आढळला. ३७.३% लोक ५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसलेले होते, तर फोन न वापरणाऱ्यांपैकी फक्त ७.१% लोकच इतका वेळ बसले.

धोका कसा वाढतो?

जास्त वेळ टॉयलेट सीटवर बसल्याने गुदद्वारातील शिरांवर दाब वाढतो. खुर्ची किंवा सोफ्यावर बसल्यासारखा आधार टॉयलेट सीटवर मिळत नाही, त्यामुळे शिरांवर ताण येतो. लोक जेव्हा फोनमध्ये स्क्रोलिंग किंवा सोशल मीडियामध्ये व्यस्त होतात, तेव्हा ते गरजेपेक्षा जास्त वेळ टॉयलेटमध्ये बसून राहतात. अशा वेळी सततच्या दाबामुळे रक्तवाहिन्या सुजतात आणि मुळव्याधीचा धोका वाढतो.

तज्ज्ञ काय म्हणतात?

हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या मेडिसिन इन्स्ट्रक्टर डॉ. त्रिशा पासरिचा यांच्या मते, स्मार्टफोन कंपन्या आपले प्लॅटफॉर्म असे डिझाईन करतात की लोक सतत त्यात गुंतून राहतात. त्यामुळेच लोक टॉयलेटमध्येही गरजेपेक्षा जास्त वेळ घालवतात. अशा वेळी फोन बाथरूमच्या बाहेर ठेवावा. तसेच शौचाची प्रक्रिया छोटी आणि सोपी ठेवावी.

मूळव्याध रोखण्याचे सोपे मार्ग (Piles Treatment at Home)

  • फोन टॉयलेटमध्ये घेऊन जाऊ नका.
  • टॉयलेटमध्ये वेळ मर्यादित ठेवा, फक्त गरज असेल तेव्हाच बसा.
  • पुरेसं पाणी प्या, म्हणजे मल मऊ राहील.
  • आहारात फायबर समाविष्ट करा, फळं, भाज्या आणि संपूर्ण धान्य खा.
  • नियमित व्यायाम करा, म्हणजे पचनक्रिया व्यवस्थित राहील.