व्हिडिओ गेम्स हा प्रकार आता नवीन राहिलेला नाही. अनेक मुले व्हिडिओ पार्लरमध्ये जाऊन तर काही स्मार्टफोनवर व्हिडिओ गेम वापरतात. या व्हिडिओ गेम वापरणाऱ्या मुलांची नैतिक निर्णयक्षमता योग्य असत नाही, असे नवीन अभ्यासात दिसून आले आहे. जी किशोरवयीन मुले हिंसक व्हिडिओ गेम पाहतात त्यांना वास्तव जीवनात सकारात्मक सामाजिक अनुभव येत नाहीत व त्यांच्यात काय बरोबर काय चुकीचे हे त्यांना समजत नाही. कॅनडातील ब्रॉक विद्यापीठातील मिरजाना बाजोविक यांनी व्हिडिओ गेम्सचा किशोरवयीन मुलांवर होणारा परिणाम तपासला. त्यात त्यांनी या मुलांच्या नैतिक निर्णयक्षमतेवर नेमका काय परिणाम होतो याचा अभ्यास केला. श्रीमती मिरजाना यांनी आठवीतील १३ ते १४ वयोगटातील मुलांच्या सवयी व इतर बाबी तपासल्या. त्यांचे गुणांकन १ ते ४ दरम्यान केले. रोज तीन तास किंवा जास्त किंवा रोज एक तास व्हिडिओ गेम खेळणाऱ्या या मुलांमध्ये सामाजिक परिपक्वतेच्या बाबतीत फरक दिसून आला. ज्यांनी जास्त काळ व्हिडिओ गेम खेळले होते त्यांच्यात जास्त वाईट परिणाम दिसून आले. गेमचा आशय व त्यावर घालवलेला वेळ या दोन्ही बाबींना महत्त्व आहे. जास्त काळ व्हिडिओ गेमचा वापर करणाऱ्या मुलांमध्ये सामाजिक परिपक्वता व नैतिक निर्णयक्षमता कमी दिसून आली. त्यात काही जणांची श्रेणी ही दुसऱ्या टप्प्यातील होती. जी मुले तीन किंवा जास्त तास हिंसक व्हिडिओ गेम पाहतात ते मात्र बाह्य़ जगापासून अलिप्त राहतात, त्यांना संधीपासून वंचित रहावे लागते. हिंसाचाराच्या आभासी जगात जास्त काळ घालवणाऱ्या गेमर्स मुलांमध्ये वास्तव जीवनात सकारात्मक सामाजिक अनुभव दिसत नाहीत व काय चांगले-काय वाईट याचा तरतमभाव करण्याची क्षमताही दिसत नाही. हिंसक नसलेले गेम किती वेळ पाहिले व त्याचा सामाजिक-नैतिक परिणाम मात्र यात अभ्यासण्यात आलेला नाही. एज्युकेशनल मीडिया इंटरनॅशनल या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Mar 2014 रोजी प्रकाशित
मुलांनो, गेम्स खेळा जपून!
व्हिडिओ गेम्स हा प्रकार आता नवीन राहिलेला नाही. अनेक मुले व्हिडिओ पार्लरमध्ये जाऊन तर काही स्मार्टफोनवर व्हिडिओ गेम वापरतात.

First published on: 01-03-2014 at 12:10 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Play computer games with care