सकाळी उठल्या-उठल्या काय खावे हा प्रश्न अनेकांना पडतो. भारतीयांमध्ये तर उठल्याबरोबर चहा घेणे ही जणू रितच आहे. मात्र नुसता चहा घेणे आरोग्यासाठी घातक असल्याने मागील काही काळापासून बोलले जात असल्याने त्यासोबत बिस्किटे, खारी, टोस्ट खाण्याचे प्रमाण वाढले. मात्र चहा- कॉफी दिवसाची सुरुवात करताना घेऊच नये असे अनेक आहारतज्ज्ञ सांगताना दिसतात. त्यामागे काही महत्त्वपूर्ण कारणे नक्कीच आहेत. काही गोष्टी रिकाम्या पोटी खाल्ल्यास आरोग्याला दिर्घकालिन अपाय होऊ शकतात. त्यामुळे रिकाम्या पोटी कोणत्या गोष्टी खाणे किंवा पिणे टाळावे हे जाणून घेऊया…
चहा – कॉफी
सकाळी उठल्या उठल्या चहा किंवा कॉफी घेण्याची सवय अनेकांना असते. हे योग्य नाही हे माहित असूनही केवळ लहानपणापासूनची सवय म्हणून किंवा कुटुंबातून चालत आलेली परंपरा म्हणून ते चालूच ठेवतात. मात्र आरोग्यासाठी हे अजिबात चांगले नसून चहामुळे पोटातील अॅसिड वाढते. त्यामुळे अल्सर किंवा छातीतील जळजळ वाढते. याप्रमाणेच उठल्यावर कॉफी प्यायल्याने फ्रेश वाटते असे अनेकांचे म्हणणे असते. मात्र कॉफीमुळे शरीरातील हॉर्मोन्सचे संतुलन बिघडण्यास कॉफी कारणीभूत ठरते. एकदा हॉर्मोन्सचे संतुलन बिघडले की ते पूर्वपदावर येण्यास बराच वेळ लागतो.
औषधे
झोपेतून उठल्यावर लगेच औषधे घेऊ नयेत. असा सल्ला डॉक्टरही आपल्या रुग्णांना अनेकदा देतात. अॅंटीबायोटीक्समधील घटक आतड्यांना त्रासदायक ठरु शकतात. यामुळे आतड्यांच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. या औषधांमुळेही अल्सर होण्याची शक्यता असते. म्हणून उठल्यावर औषधे घेऊ नयेत.
मसालेदार पदार्थ
सकाळच्या नाश्त्याला तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाऊ नयेत. मसाले किंवा मिरच्यांमुळे पोटात अॅसिडची निर्मिती होते. यामुळेही अल्सर होऊ शकतो. तिखट पदार्थ सकाळी सकाळी खाल्ल्यामुळे शौचासही त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो तेलकट आणि तिखट पदार्थ नाश्त्याला टाळावेत.
बिअर आणि शीतपेये
सकाळी उठल्यावर शक्यतो कोणी शीतपेये आणि बिअर पीत नाही. मात्र सकाळपासून पोट रिकामे असले आणि एकदम जेवणादरम्यान शीतपेय किंवा बिअर घेतल्यास ते आरोग्यासाठी अतिशय हानीकारक ठरु शकते. रिकाम्या पोटी बिअर घेतल्यास जास्त नशा चढते आणि ते आरोग्यासाठीही हानिकारक असते. शीतपेयांमुळे मळमळणे, अॅसिडीटी अशा समस्या उद्भवू शकतात.