बी जीवनसत्त्व पूरक म्हणून घेतल्याने हवा प्रदूषणामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची तीव्रता कमी करता येते, असा दावा एका संशोधनात केला आहे. कोलंबिया विद्यापीठातील संशोधकांच्या मते बी जीवनसत्त्व हे हवा प्रदूषणाचा एपिजिनोमवर होणारा परिणाम कमी करते, त्यातील संयुगे जनुकांना महत्त्वाच्या आज्ञा देतात. त्यामुळे हे घडून येते. पीएम २.५ कणांचा परिणाम यात कमी केला जातो. हे कण २.५ मायक्रोमीटर आकाराचे असतात. ज्या भागात एवढय़ा व्यासाच्या कणांचे प्रदूषण आहे, तेथे लोकांना बी जीवनसत्त्वाचा फायदा होतो. हवा प्रदूषणाने आरोग्यावर जो परिणाम होतो, त्यात विशिष्ट रेणूंचा काय संबंध असतो हे अजून समजलेले नाही. पण बी जीवसत्त्वामुळे फायदा होतो हे निश्चित आहे, असा दावा कोलंबिया विद्यापीठाच्या मेलमन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या प्राध्यापक अँड्रिया बॅकारेली यांनी केला आहे. प्रदूषणाचे परिणाम औषधांनी कमी करण्याचा प्रयत्न करता येतो. त्या दृष्टिकोनातून हे संशोधन झाले आहे. एपिजेनेटिक बदलांमुळे पर्यावरण प्रदूषणाचे शरीरावर परिणाम होतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते जगातील ९२ टक्के लोक घनमीटरला १० मायक्रोग्रॅम प्रदूषके असलेल्या भागात राहतात, त्यामुळे प्रदूषक द्रव्यांचे कण फुफ्फुसात जाऊन त्रास होतो. हवा प्रदूषणाचा आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो, असे मुख्य संशोधक झोंग यांनी म्हटले आहे. ५० मिलिग्रॅम बी ६ व १ मिलिग्रॅम बी १२ जीवनसत्त्व तसेच २.५ मिलिग्रॅम फॉलिक अ‍ॅसिड रोज घेतले तर प्रदूषणाचे परिणाम कमी होतात. १८ ते ६० वयोगटातील धूम्रपान न करणाऱ्या लोकांवर हे प्रयोग केले गेले.