scorecardresearch

यकृताचे विकार टाळण्यासाठी पथ्ये गरजेची

यकृत विकार भारतात वाढत आहेत. मृत्यूमागच्या कारणांपैकी यकृत विकार दहावे मोठे कारण ठरत आहे, असे तज्ज्ञ सांगतात.

प्रतिनिधिक छायाचित्र

नवी दिल्ली : दरवर्षी १९ एप्रिलला जागतिक यकृत (लिव्हर) दिन साजरा केला जातो. यकृताचे आरोग्य आणि त्याच्या विकारांविषयी जागृती हा त्यामागचा हेतू आहे. यकृत हा मेंदूनंतर शरीरातील सर्वात मोठा आणि गुंतागुंतीचा अवयव आहे. रोगप्रतिकारक क्षमता, पचन, चयापचय, अन्नातील शोषलेल्या पोषणद्रव्यांचे संचय अन् विषद्रव्यांचे उत्सर्जन आदी महत्त्वाचे कार्य यकृत करते. यकृत विकार भारतात वाढत आहेत. मृत्यूमागच्या कारणांपैकी यकृत विकार दहावे मोठे कारण ठरत आहे, असे तज्ज्ञ सांगतात.

विषाणू संसर्ग, जनुके आणि जीवशैलीसह अतिमद्यपान, अतिधूम्रपान, खाण्यातील कुपथ्ये, वाढलेले वजन यामुळे यकृत विकाराचा धोका असतो. यकृताची संपूर्ण हानी होण्याआधी मळमळ, उलटय़ा, ओटीपोटाच्या वरच्या भागात दुखणे किंवा कावीळ अशी लक्षणे दिसतात. ती वेळीच ओळखून उपचार करणे महत्त्वाचे आहे.

यकृत चांगले ठेवण्यासाठी पाळावयाची पथ्ये पुढीलप्रमाणे :

*  वजन आटोक्यात ठेवणे : स्थूलपणामुळे मद्याविना यकृतवृद्धीचा विकार होतो. त्याला ‘नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज’ म्हणतात. त्यामुळे वजन अटोक्यात ठेवा.

* संतुलित आहार घेणे : अति उष्मांक असलेले भोजन, चरबी, प्रक्रियायुक्त कबरेदके (पांढरा ब्रेड, भात, पास्ता), साखरेचे अतिसेवन टाळावे. आहारात तंतूयुक्त पदार्थ असावेत. ताजी फळे, भाजीपाला, भाकरी आणि योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे.

*  विषाणू संसर्ग टाळा : हेपिटाययटिस बी आणि हेपिटायटिस सी या विषाणूंचा संसर्ग टाळावा. असुरक्षित लैंगिक संबंध, रक्तसंक्रमण, दुसऱ्याचा टूथब्रश, दाढीचे ब्लेड वगैरे वापरू नयेत. टॅटू वगैरे काढताना पुरेशी स्वच्छता बाळगा. पालक किंवा तुमच्यात हॅपिटायटिस बी किंवा सी संक्रमण झाले असल्यास नियमित तपासणी व उपाय करा. संसर्ग होऊ नये म्हणून प्रतिबंधक लस घ्यावी. फवारणीद्वारे मारली जाणारी कीटकनाशके, रसायनांपासून दूर राहा. घरात कीटकनाशके फवारताना मुखपट्टी लावा व दारे-खिडक्या उघडय़ा ठेवा.

* मद्यपान, धूम्रपान, अमली पदार्थ टाळा : मद्यपानामुळे यकृत खराब होते. त्याला अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डीसीज म्हणतात. मद्यपान टाळावेच. धूम्रपानामुळे धोका वाढतो.  वैद्यकीय सल्ल्यांशिवाय घेतली जाणारी वेदनाशामक औषधे, झोपेची औषधे  किंवा इतर औषधांचे मिश्रण यकृतासाठी घातक ठरते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Preventive care in chronic liver disease foods to avoid in liver disease zws

ताज्या बातम्या