मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर किंवा इतर काही औषधांमुळे तोंडाला वारंवार कोरडेपणा येण्याची शक्यता असते. या औषधांमुळे आवश्यक तेवढी लाळ तयार होत नसल्याने तोंड कोरडे पडते. त्यामुळे कोरडे पदार्थ खाताना तोंडात वारंवार जखमा होतात. गिळता न येणे, संसर्ग, दाताची कीड, जीभेवर चट्टा अशी लक्षणे दिसून येतात. हा गंभीर स्वरुपाचा आजार नसला तरीही रुग्णांना खाणे, दैनंदिन क्रिया करणे अवघड जाते. या रुग्णांनी खालील काळजी घेणे आवश्यक आहे.

उपाय – 

१. वारंवार पाणी पिणे – अशा रुग्णांनी दर १ ते २ तासांनी निदान घोटभर तरी पाणी प्यावे. याने तोंड ओले ठेवण्यास मदत होते. बर्फ चघळल्यास त्याचाही फायदा होतो.

२. कोरडे, कडक पदार्थ टाळावेत – पापड, खाकरा, कोरडा चिवडा असे पदार्थ टाळावेत. या पदार्थांनी जखम होऊ शकते.

३. सूप, पातळ भाजी, मऊ पदार्थ यांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करावा.

४. २-३ वेळा ब्रश करुन तोंड जास्ती जास्त स्वच्छ ठेवावे.

५. मद्यपान, धुम्रपान टाळावे.

६. जास्त त्रास, वेदना, जखमा इ. असल्यास त्वरीत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कृत्रिम लाळ तयार करणारी किंवा इतर औषधे वापरुन रुग्णाचे जीवन सुसह्य करता येते.

कारणे –

१. कॅन्सर उपचारानंतर याचा त्रास फारच जास्त असू शकतो.

२. लाळग्रंथीचे विकार

३. मधुमेह, रक्तदाब व इतर काही आजार तसेच त्यांच्यासाठी दिलेल्या औषधांचा दुष्परीणाम

४. अतिमद्यपान

५. पाणी कमी पिणे
लक्षणे –

१. गिळताना त्रास होणे – विशेषतः कोरडे पदार्थ जसे की पापड, खाकरा, बिस्कीटे इ.

२. कवळी व्यवस्थित न बसणे अथवा त्रास होणे.

३. बोलताना जीभ टाळूला चिकटून बोलताना त्रास होणे

४. वारंवार जखमा आणि संसर्ग होणे

निदान –

योग्य तपासणी, पूर्ण वैयक्तिक माहिती व गरज पडल्यास लाळग्रंथींची तपासणी याव्दारे निदान करता येते.
डॉ. प्रियांका साखवळकर, तोंडाचे विकारतज्ज्ञ

priyankasakhavalkar@yahoo.com