Protein Calcium Sources For Vegetarians: डाळी या भारतीय जेवणातील एक अविभाज्य भाग आहेत. आपण वजन कमी करू इच्छित असाल पण यामुळे तुमच्या नेहमीची कामे करण्यात अडथळा येऊ नये असे वाटत असेल तर शरीराचं प्रणालीत प्रोटिनचा पुरवठा करणे अनिवार्य मानले जाते. सतत उर्जावान राहण्यासाठी शरीराला प्रोटीनची खूप आवश्यकता असते. मांसाहार न करणाऱ्यांसाठी डाळी हा प्रोटीनचा खजिना आहेत. याशिवायही डाळी कॅल्शियमचा सुद्धा स्रोत असतात. यामुळे आहारात डाळींचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. पण अधिकाधिक प्रोटीन व कॅल्शियम मिळवून देणाऱ्या डाळी कोणत्या व त्यामुळे शरीराला काय फायदे मिळू शकतात हे जाणून घेऊया…

चणा डाळ

चणा किंवा हरभऱ्याची डाळ ही फायबर युक्त असते त्याशिवाय यात प्रोटीन सुद्धा मुबलक प्रमाणात असतात. चणा डाळीत असणारे लोह, कॅल्शियम, पोटॅशियम व अन्य पोषक सत्व शरीराला फायदेशीर ठरू शकतात. ही डाळ तुमचे ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यातही मदत करू शकते.

मसूर डाळ

मसूर डाळीमध्ये प्रोटीन, लोह, व्हिटॅमिन -सी, कॅल्शियम, मॅग्नेशियम व झिंक यांचा मुबलक साठा असतो. यामुळे शरीराला आवश्यक सर्व सत्व एक वाटी मसूराची भाजी किंवा डाळ आपल्याला पुरवू शकते.

तुर डाळ

तुरीची डाळ व्हिटॅमिन, मिनरल व पोषक सत्वांनी समृद्ध असते. या डाळीतील सत्व शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतात. डायबिटीज व हृदय विकार असलेल्या लोकांना तुरीची डाळ आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला दिला जातो.

उडीद डाळ

उडीद डाळ प्रोटीन व व्हिटॅमिन बीचा समृद्ध स्रोत आहे. याशिवाय पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह उडीद डाळीचे आहारातील महत्त्व वाढवतात. पचनाची प्रक्रिया जलद करण्याचे काम उडीद डाळ करत असल्याने वजन कमी करण्यात या डाळीचा फायदा होत होऊ शकतो.

डाळींच्या सेवनाची योग्य पद्धत

डाळ ही आमटी/ वरणासारखी खा किंवा सुक्या भाजीसारखी पण डाळ असलेला पदार्थ बनवण्याआधी डाळ भिजवणे अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे डाळीतील अमायलेस उत्तेजित करण्यास देखील मदत करते. डाळींमध्ये मिळणाऱ्या स्टार्चचे ग्लुकोज आणि माल्टोजचे यामुळे विघटन जलद होते व परिणामी जेवण शरीराला पचण्यास सोपे पडते. डाळ धुण्याबरोबरच, भिजवल्याने ऑलिगोसॅकराइड्स काढून टाकण्यास देखील मदत होते, जी एक प्रकारची साखर आहे, ज्यामुळे सूज व अस्वस्थता येते. जास्तीत जास्त पोषक द्रव्ये मिळविण्यासाठी आणि चांगले पचन होण्यासाठी डाळ शिजवण्यापूर्वी भिजवणे आवश्यक आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे यास वैद्यकीय सल्ला समजू नये)