Quick Ways To Get Rid Of Gas And Bloating : आतडे हा आपल्या पचनसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. जे दोन मुख्य भागांमध्ये विभागलेले आहे, एक लहान आतडे आणि दुसरे मोठे आतडे. लहान आतडे अन्न पचवण्याचे आणि पोषक तत्वे शोषण्याचे काम करते, तर मोठे आतडे पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स शोषून घेते आणि विष्ठा साठवते. शरीरासाठी पोषण, ऊर्जा आणि एकंदर आरोग्य राखण्यात आतडे महत्त्वाची भूमिका बजावतात. जेव्हा आतडे योग्यरित्या काम करतात तेव्हा पचनसंस्था निरोगी राहते. म्हणून, आतड्यांची स्वच्छता आणि डिटॉक्सिफिकेशन आवश्यक आहे. आतडे स्वच्छ ठेवल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, वजन नियंत्रित राहते, पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि त्वचेचे आरोग्य निरोगी राहते. यामुळे आतड्यांचे आरोग्य निरोगी असणं आपल्या एकूण आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत.
आतड्यांमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण झाल्यास गॅस, सूज येणे, बद्धकोष्ठता आणि थकवा यासारख्या समस्या उद्भवू शकतात. आतड्यांचे आरोग्य निरोगी असल्यास मायक्रोबायोम आजारांपासून दूर राहता येते. पोषक तत्वांचे शोषण सुरळीत होते आणि जळजळ कमी होते. हार्वर्ड अँड स्टॅनफोर्ड येथील प्रशिक्षित गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी इन्स्टाग्रामवर आतड्यांच्या निरोगी आरोग्यासाठी काही सवयींबद्दल सांगितले आहे. या सवयी वैज्ञानिक आधारावर आधारित आहेत आणि त्या सहजपणे तुम्ही फ़ॉलो करु शकता. या सवयी फॉलो करत तुम्ही अपचन, बद्धकोष्ठता, गॅसच्या समस्येपासून दूर राहू शकता.
अपचन, बद्धकोष्ठता, गॅसच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी ५ सोप्या सवयी
१) दिवसाची सुरुवात कोमट पाणी पिऊन करा
जर तुम्हाला आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करा. ७-८ तासांच्या झोपेनंतर शरीर डिहायड्रेट होते, म्हणून सकाळी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते, शरीरात डिहायड्रेशनची समस्या जाणवत नाही. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल हालचाली सक्रिय होतात, ज्यामुळे नैसर्गिकरित्या आतड्यांची हालचाल होण्यास मदत होते, पोट साफ राहते.
२) सकाळ- सकाळ हलका व्यायाम करा
जर तुम्हाला पचनक्रिया निरोगी ठेवायची असेल आणि आतड्यांचे कार्य व्यवस्थित ठेवायचे असेल तर सकाळी उठल्यानंतर योगा, स्ट्रेचिंग किंवा वेगाने चालणे असे काही हलके व्यायाम प्रकार करा. हे निरोगी व्यायाम प्रकार पोटाच्या स्नायूंना चालना देतात. ज्यामुळे पेरिस्टॅलिसिसलाही चालना मिळते. रोज सकाळी हलके व्यायाम प्रकार केल्यास आतड्यांचे आरोग्य निरोगी राहते आणि गुड बॅक्टेरिया वाढतात. पचनसंस्था सुधारण्यासाठी रोज सकाळी हलके व्यायाम प्रकार करा.
३) नाश्त्यात फायबरयुक्त पदार्थ खा
जर पचनक्रिया सुरळीत ठेवायची असेल तर सकाळच्या नाश्त्यात फायबरयुक्त पदार्थ खा. डायटरी फायबर हे प्रीबायोटिक आहे, म्हणजेच ते आतड्यांमध्ये असलेल्या गुड बॅक्टेरियांना अन्न पुरवते. यामुळे आतड्यातील मायक्रोबायोम संतुलित आणि निरोगी राहते, जे मजबूत प्रतिकारशक्ती आणि चांगल्या पचनासाठी आवश्यक आहे. फायबरयुक्त पदार्थांमध्ये बेरी आणि अळशीच्या बिया घालून ओटमील खाऊ शकता. होल ग्रेन टोस्टसह एवोकॅडो खा. चिया पुडिंगसह बदामाचे दूध आणि केळी खाऊ शकता. नाश्त्यात किमान ५-८ ग्रॅम फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा.
४) जेवणावर लक्ष केंद्रित करा
जेवणावर लक्ष केंद्रित करा. जेवताना फोनवर बोलणे किंवा टीव्ही पाहणे टाळा, जेवताना लक्ष विचलित झाल्यास शरीरात ताण वाढू शकतो, ज्यामुळे पचनक्रिया मंदावते. जर तुम्ही टीव्ही पाहत किंवा मोबाईल स्क्रोल करत जेवला तर जास्त खाण्याची शक्यता वाढते. जर तुम्ही लक्षपूर्वक अन्न खाल्ले तर पोषक तत्वांचे शोषण चांगले होते. तुम्हाला गॅस, पोटफुगी आणि अपचनापासून आराम मिळतो. तुम्ही अन्न योग्यरित्या चावत खाल्लास जास्त लाळ निर्माण होते. जेवताना टेबलावर बसा, हळूहळू चावा आणि अन्नाच्या चवीकडे लक्ष द्या.
५) आल्याचा चहा आणि लिंबू पाणी
पचन सुधारण्यासाठी आल्याची चहा किंवा लिंबूपाणी प्या. आल्यामध्ये जिंजरॉल आणि शोगाओल असते. जे पोट रिकामी करण्यास मदत करते. तसेच मळमळ कमी करण्यास आणि पोट फुगी नियंत्रित करण्यास मदत करते. लिंबू पाणी व्हिटॅमिन सीने समृद्ध आहे, ज्यामुळे पोटातील आम्लता किंचित वाढवू शकते , जे प्रथिने पचन आणि पोषक तत्वांचे शोषण करण्यास मदत करते. जर तुम्हाला पोटाच्या अस्तरांना आराम द्यायचा असेल तर हे पेय प्या.