Healthy Breakfast For Diabetes : डायबिटीज आजार म्हटले की, गोड पदार्थांना विसरून जायचे, जेवणात पथ्ये पाळायची, रक्तातील साखर नियमित तपासायची तपासायची अशी अनेक बंधने या रुग्णांवर लादली जातात. आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे डायबिटीस खूप झपाट्याने पसरत आहे. परिस्थिती अशी आहे की, आजच्या काळात केवळ वृद्धच नाही, तर तरुण आणि लहान मुलेही मधुमेहाला बळी पडत आहेत. जेव्हा स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही किंवा तयार होणारे इन्सुलिन योग्यरीत्या वापरले जात नाही. तेव्हा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे तुम्ही काय खाता यावर लक्ष ठेवले पाहिजे.

मधुमेही रुग्णांसाठी पोषण घटकांनी भरलेला नाश्ता केला, तर दिवसभर त्यांना रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर ठेवण्यास मदत होऊ शकते.

त्यामुळे ज्यांना मधुमेह आहे, त्यांच्यासाठी नाश्त्याचे काही उत्तम पर्याय खालीलप्रमाणे :

१. भाज्यांचा उपमा – उपमा हा एक लोकप्रिय दक्षिण भारतीय पदार्थ आहे; जो वाटाणे, गाजर यांसारख्या फायबरयुक्त भाज्या घालून मधुमेह असणाऱ्यांना नाश्ता म्हणून देऊ शकतो. निरोगी आणि रक्तातील साखर हळूहळू वाढण्यासाठी रव्याऐवजी ओट्स किंवा गहू निवडा म्हणजे तुम्हाला सतत भूक लागणार नाही.

२. मूग डाळीचा (धिरडे) चिला – प्रथिनेयुक्त पर्याय जो मिक्सरमध्ये बारीक केलेल्या मूग डाळीपासून बनवला जातो. हलका, पोटभर व साखरेचे प्रमाण कमी असणाऱ्या या नाश्त्यात तुम्ही पालक, कांदे किंवा टोमॅटो घातल्याने फायबरचे प्रमाण वाढण्यास मदत होते आणि साखरेचे शोषण कमी होते.

३. ओट्स इडली – भारतीय इडलीला ट्विस्ट देऊन तुम्ही आरोग्यदायी ओट्स इडली बनवू शकता. इडल्या ओट्सपासून बनवल्या जातात म्हणून त्या पचण्यास सोप्या असतात. तसेच, ओट्समध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो, जो रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत करतो आणि त्याचबरोबर तुम्हाला आवश्यक पोषक घटकदेखील देतो.

४. बेसनाचे धिरडे – चण्याच्या पिठापासून बनवलेल्या बेसनाच्या धिरड्यांमध्ये भरपूर प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स कमी असतात. बेसनाच्या धिरड्यांना कांदे, टोमॅटो, पालकची जोड दिल्याने पौष्टिक मूल्य वाढते आणि मधुमेहींसाठी तो अनुकूल नाश्ता ठरते.

५. भाज्या मिश्रित पोहे- भाज्या आणि तेल घालून बनवलेले पोहे हलके; पण पोटभर नाश्ता ठरू शकतात. पांढऱ्या रंगाऐवजी तांबडे किंवा ब्राऊन पोहे वापरल्याने फायबरचे प्रमाणदेखील वाढते.

६. कडधान्यांची कोशिंबीर – मोड आलेले मूग आणि चिरलेली काकडी, कांदे व टोमॅटो मिसळून खाल्ल्याने शरीराला प्रथिने जास्त प्रमाणात मिळतात. मूग, मटकीसारखे अंकुरलेले कडधान्य हळूहळू पचते. त्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखर पटकन वाढत नाही.

७. नाचणीचा डोसा – नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह, फायबरचे प्रमाण जास्त असते. चटणी किंवा फक्त डोसा जरी खाल्ला तरी रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असलेल्या लोकांसाठी तो फायदेशीर ठरू शकतो. कारण- नाचणीचा डोसा हळूहळू पचतो आणि ग्लुकोजच्या वाढीस प्रतिबंध घालतो.