रंगाने पांढरा शुभ्र पण चवीला तिखट, बराचसा उग्र आणि थोडासा कडवट चवीचा मुळा अनेक औषधी गुणधर्मानी युक्त आहे. बाराही महिने उपलब्ध असणारा मुळा हा शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. हृदयाशी संबधीत आजारामध्ये किंवा कोलेस्ट्रॉल रुग्णांसाठी मुळ्याचे सेवन लाभदायक आहे. मुळा पचनासाठी उपयुक्त असून गॅसेस कमी करण्यास मदत करतो, सर्दी-सायनससारख्या व्याधीतही मुळा खाल्ल्यास आराम पडतो. मूळव्याध कमी करण्यातही मुळा फायदेशीर आहे.

मुळा खाल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. कावीळ झाल्यास जेवणात मुळ्याचा समावेश करावा. मुळ्यामुळे रक्त शुद्ध होते आणि रक्तात ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळीत होतो. शरीरातली विषारी द्रव्यं बाहेर काढण्याचा गुणधर्म मुळ्यात असून किडनी स्टोन, जंत या विकारांवरही मुळा उपयोगी आहे. मुळ्यात बी ६ जीवनसत्त्व, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम असल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. मुळा शक्यतो सोलू नये, कच्चाच खावा, मुळ्याची पानंही फेकू नयेत, कारण त्यातही अनेक जीवनसत्त्वं आणि खनिजं असतात.

चवीला तिखट, बराचसा उग्र आणि चवीचा थोडासा कडवट असल्यामुळे अनेकजण मुळा खाणं टाळतात. मुळ्याची भाजी किंवा कच्चा मुळा खाऊ वाटत नसेल तर मुळ्याची चटणी करून सेवन करावं. जाणून घेऊयात मुळ्याची चटणी कशी करतात…

साहित्य: १ मोठा मुळा. १/२ वाटी ओलं खोबरं, १ मोठा चमचा भाजलेली उडीद डाळ, १/२ वाटी दही, ७-८ कढीलिंबाची पानं, ४ हिरव्या मिरच्या, चवीला मीठ, साखर, कोथिंबीर, फोडणीसाठी १ मोठा चमचा तेल, मोहरी, हिंग, हळद, चिमूटभर मेथी पूड, १ लाल सुकी मिरची.

कृती : मुळा किसून घ्यावा. तेलाची फोडणी करून त्यात उडीद डाळ आणि लाल मिरची परतावी, खोबरं, डाळं, मिरच्या, दही एकत्र करून बारीक वाटावं, त्यात किसलेला मुळा, मीठ, साखर, कोथिंबीर आणि फोडणी मिसळावी.